होमपेज › Satara › जावलीत पाण्यासारखी घरपोच मिळते दारू

जावलीत पाण्यासारखी घरपोच मिळते दारू

Published On: Jun 15 2018 1:07AM | Last Updated: Jun 14 2018 10:11PMमेढा : वार्ताहर

जावली तालुक्यात पोलिसांनी अवैध दारूधंदेवाल्यांच्या मुसक्या आवळल्याने दारूधंदेवाले सैरभैर  झाले आहेत. संपूर्ण तालुक्यात अवैध दारु विक्रीने उच्छाद मांडला होता. पिण्याच्या पाण्याप्रमाणे अवैध दारु घरपोच विक्री केली जात होती. त्याला चाप बसू लागला आहे.  सध्या जावली तालुक्यात अवैध दारूधंदा पाण्यासारखा चालू असून पाण्याचे 20 लिटरचे जार जसजसे घरपोच होवू लागलेत त्या पध्दतीने अवैध दारू घरपोच विक्री करणारे सुध्दा वाढू लागले आहेत. या व्यवसायाला ब्रेक लावण्यासाठी व्यसनमुक्त युवक संघटनेने तालुक्यात चांगलीच कंबर कसली असून पोलिसांना अवैध दारू पकडून देण्याची महत्वाची भूमिका बजावत आहेत. 

मेढा, करहर, कुडाळ, केळघर विभागात व्यसनमुक्त संघटनेचे कार्यकर्ते जीवाची पर्वा न करता दारु पकडण्याचे काम पोलीसांना करून देत आहेत. त्यांच्या बरोबरीने पोलीस यंत्रणासुध्दा अवैध धंदेवाल्यांच्या शोधात  पळू लागल्याने या धंदेवाल्यांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. गेली 22 वर्षे झाली, जावली तालुक्यातून दारू दुकान मुक्तीची पेटलेली ज्योत पुन्हा उभारी घेण्याचे काम करीत आहे. व्यसनमुक्त संघटना सोडली तर कोणीही अवैध धंदे थांबवण्यासाठी प्रयत्न करत नाही. त्याच्या उलट चर्चा तालुक्याच्या मुख्यालयात ऐकण्यास मिळत आहे. 

दारूधंदे बंद झाल्याने मेढयातील व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे बर्‍याच नगरसेवकांचा आडवी बाटली उभी करण्यासाठी व तसा नगरपंचायतीत ठराव घेण्याचा मनोदय सुरू असल्याचे समजते. त्यामुळे मेढयात पुन्हा दारू दुकाने चालू झाली तर कोणी नवल वाटून घेवू नये? अशाच प्रतिक्रिया मेढयातून उमटू लागल्या आहेत. त्यामुळे व्यसनमुक्त संघटनेने अवैध धंदे पकडण्यापेक्षा त्यांच्यावर प्रबोधन करून उपाययोजना कराव्यात, अशी प्रतिक्रिया जनमानसातून येत आहेत. 

संघटनेने पकडून दिलेला आरोपी जर पोलीसांकडून दहा मिनिटात जामीनावर सुटत असेल, तर तो शंभर वेळा गुन्हा करायला तयारच असतो. अवैध दारु विक्रेत्यांवर कडक कारवाई होण्यासाठी कायदा कडक बनला पाहिजे. समाजाने कितीही उठाव केला तरी त्याचा पाठपुरावा शेवटपर्यंत रहात नसल्याने अवैध धंदेवाल्यांचे फावले आहे. त्यामुळे ये रे माझ्या मागल्या... होण्यापेक्षा अवैध धंदे बंद करण्याबरोबर प्रबोधनसुध्दा होणे गरजेचे आहे.