Sat, Jul 20, 2019 23:22होमपेज › Satara › पाटणमध्ये चिमुकल्यांचे स्वच्छतेचे ‘सोंग’

पाटणमध्ये चिमुकल्यांचे स्वच्छतेचे ‘सोंग’

Published On: Mar 06 2018 7:54PM | Last Updated: Mar 06 2018 7:41PMपाटण  : गणेशचंद्र पिसाळ 

पूर्वी होळीच्या दिवसात वेगवेगळी सोंग काढण्याची प्रथा होती. मात्र बदलत्या काळात ती बंद पडली होती. मात्र पाटण शहरात नगरपंचायत व जनता यांच्याकडून अनेक ठिकाणी कचर्‍याचे साम्राज्य पसरलेले असते. याबाबत जनता, प्रसिद्धी माध्यमे असोत किंवा शासकीय विभाग. या सर्वांनी या अस्वच्छतेविरोधात आपापल्या परीने प्रयत्न केले. मात्र त्याला म्हणावासा प्रतिसाद मिळाला नाही सरतेशेवटी आता शहरातील शाळकरी मुलांनीच सोंगातून याचे महत्त्व पटवून देण्यासाठी पुढाकार घेत सार्वत्रिक चपराक दिली आहे.   

पाटण शहरात ग्रामपंचायतीची नगरपंचायत होवूनही अस्वच्छतेबाबत अद्यापही म्हणावेसे गांभीर्य नागरिक, नगरसेवक, पदाधिकारी, अधिकारी व कर्मचार्‍यांना नाही हीच खरी शोकांतिका आहे. ‘मी कचरा करणार नाही आणि करूनही देणार नाही ’असे घोषवाक्य जन्माला घातलेल्या याच नगरपंचायतीच्या या घोषवाक्याची अंमलबजावणी आजवर केवळ त्या फ्लेक्सपूरत्याच मर्यादीत राहिल्या आहेत. 
अगदी कचरा गोळा करणारे टॅक्टर कचर्‍याने ओसंडून वाहत असल्याने मग शहरातील काही ठिकाणच्या स्वच्छ रस्त्यावर पुन्हा कचरा करण्याचे काम हीच नगरपंचायतीची गलथान व्यवस्था करत असते. 

याबाबत जनजागृतीपेक्षा प्रत्यक्ष कृतीची नितांत गरज आहे. कारण जवळपास सगळेच जण सल्लागार बनल्याने मग प्रत्यक्ष कृतीच्या नावानं कायमच शिमगा असतो. अगदी नगरपंचायतीच्या वतीने स्वच्छतेबाबत ज्या ज्या ठिकाणी कारवाईचे फलक लावले आहेत त्याच ठिकाणी हमखास कचरा टाकला जातो. मात्र टाकणार्‍यांना अद्यापही दंड झाला नाही तर टाकलेला कचरा वेळेत उचलला गेला नाही. त्यामुळे शेवटी हाल होताहेत ते प्रामाणिकपणे कर भरणार्‍या करदात्यांचे मात्र याचे सोयरसुतक कोणालाच नाही. तर जी नगरपंचायत स्वतःच्या कार्यालयाचा परिसर स्वच्छ ठेवू शकत नाही ती शहर काय व्यवस्थीत ठेवणार ? असा प्रश्‍न नागरिक विचारत आहेत. 
 

 आता किमान अशा होळीच्या सोंगातून शाळकरी मुलांनी याबाबत दिलेली सामाजिक चपराक लक्षात घेऊन तरी नागरिकांसह नगरपंचायतीने आपापल्या कारभारात सुधारणा करावी. अन्यथा मग पुन्हा याच बालकांना थेट मान्यवरांचीच सोंगे काढण्याची वेळ येईल याचाही विचार व्हावा एवढचं.