होमपेज › Satara › अलगुडवाडीत वाळू माफियांचा पोलिसांना जिवे मारण्याचा प्रयत्न

अलगुडवाडीत वाळू माफियांचा पोलिसांना जिवे मारण्याचा प्रयत्न

Published On: May 12 2018 1:32AM | Last Updated: May 11 2018 10:44PMफलटण : प्रतिनिधी

अलगुडवाडी (ता. फलटण) करंज ओढ्यातून अवैध वाळू उपसा करणार्‍या वाळू व्यावसायिकांना पोलिसांनी अडवून चौकशी केली असता व्यावसायिकांनी पोलिसांच्या अंगावर ट्रॅक्टर घालून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पोलिसांनी तीन संशयितांना अटक केली आहे. अलगुडवाडी येथील करंज ओढ्यात गुरुवारी अवैध वाळू उपसा सुरू असल्याची माहिती परिविक्षाधीन पोलिस अधीक्षक पवन बनसोड यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी तत्काळ फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पथक कारवाईसाठी पाठवले. हे पथक घटनास्थळी पोहोचले. मात्र, याची वाळू व्यवसायिकांना चाहूल लागली. यानंतर वाळू भरलेल्या ट्रॅक्टर व ट्रॉली जवळील 5 ते 6 जणांनी पोलिसांना दगड मारण्यास सुरूवात केली. 

त्यानंतर ट्रॅक्टरमधून बसून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सहाय्यक फौजदार रासकर व हवालदार भोसले यांनी हा ट्रॅक्टर अडवला असता चालकाने त्यांच्या अंगावर ट्रॅक्टर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यानंतर ते तेथून पळून जाण्यात यशस्वी झाले. हा प्रकार घडल्यानंतर पोलिसांनी एक जादा कुमक मागवून जेसीबी व ट्रॅक्टर ताब्यात घेतला. यावेळी संशयित अक्षय नवनाथ करचे (वय 22)  काळूराम गोरख गुंजाळ (वय 24)  व  एक अल्पवयीन मुलगा (सर्व रा. अलगुडवाडी) यांना अटक केली आहे. ताब्यात घेतलेल्या संशयितांकडून पसार झालेल्यांची माहिती घेण्याचे काम सुरू आहे. त्यांच्या शोधासाठी विविध ठिकाणी पथके रवाना करण्यात आली आहेत. तपास पोलिस उपनिरीक्षक आर.आर. भोसले करत आहेत.