Thu, Mar 21, 2019 11:07होमपेज › Satara › करंजेत वाळूचा बेकायदा साठा

करंजेत वाळूचा बेकायदा साठा

Published On: Sep 08 2018 1:33AM | Last Updated: Sep 07 2018 10:21PMसातारा : प्रतिनिधी

सातार्‍यातील करंजे पेठेतील मेहर देशमुख कॉलनीच्या खुल्या जागेत 110 ब्रास वाळूचा बेकायदा केलेला साठा पोलिसांनी उघडकीस आणला. पोलिस उपअधीक्षक गजानन राजमाने यांनी यासंदर्भात सातारा तहसील कार्यालयाला कल्पना दिल्यावर  सातारा मंडलाधिकार्‍यांनी पंचनामा केला असून, हा बेकायदा वाळू साठा किरण अनिल कुर्‍हाडे यांचा असल्याचे तपासात पुढे आले.

सातारा तालुक्यातील महसूल यंत्रणेला अंधारात ठेवून  वाळू माफियांकडून बेकायदा वाळू उपसा, वाहतूक सुरू असतानाच बेकायदा वाळू साठे निर्माण केले जात असल्याचे उघडकीस येऊ लागले आहे. तालुक्यात वाळू माफियांकडून सुरू असलेल्या या गैरप्रकारांमुळे महसूल यंत्रणांसमोर आव्हान उभे केले आहे. आठ-पंधरा दिवसांला बेकायदा वाळूच्या घटना समोर येत आहेत. खनिकर्म विभागाने वाळू लिलावाच्या अनेक फेर्‍या काढल्या.

मात्र, या लिलाव प्रक्रियेत भाग न घेता वाळू माफियांनी बेकायदेशीर वाळू उपसा सुरू केला आहे. सप्टेंबर महिन्यापासून वाळू उपशाला बंदी केली जाते. वाळू उपसा परवाना दिला जात नाही. त्यामुळे या महिन्यात वाळू माफियांकडून वाळू साठवली जाते. वाळूला ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात जादा मागणी असते. त्यामुळे शहरी भागातही अशा वाळूचा मोठ्या प्रमाणावर साठा केला जातो. सातार्‍यातील करंजे पेठेतील मेहेर देशमुख कॉलनीच्या ओपन स्पेसमध्ये (खुली जागा) पोलिसांना वाळूचा डोंगर सापडला. त्याठिकाणी कोणतेही बांधकाम सुरु नसताना प्रचंड प्रमाणात वाळूचा साठा पोलिस उपअधीक्षक गजानन राजमाने यांनी उघडकीस आला. 

110 ब्रास वाळू जप्त

राजमाने यांनी सातारा तहसीलदार नीलप्रसाद चव्हाण यांना कल्पना दिली. चव्हाण यांनी सातारा सर्कल पिसाळ यांना पंचनामे करून पुढील कारवाईच्या सूचना दिल्या. महसूल विभागाने केलेल्या पंचनाम्यात मेहेर देशमुख कॉलनीतील वाळूचा साठा सुमारे 110 ब्रास असल्याचे स्पष्ट झाले. ही वाळूसाठा किरण अनिल कुर्‍हाडे यांनी केला असल्याचे तपासात निष्पन्‍न झाले. सायंकाळी उशिरापर्यंत पंचनामे करण्याचे काम सुरू होते. दोन दिवसांत कुर्‍हाडे यांना दंडाचे चलन दिले जाईल, अशी माहिती तहसील कार्यालयातून देण्यात आली.