Tue, Jan 22, 2019 18:23होमपेज › Satara › चारित्र्याच्या संशयावरून अपशिंगे येथे पत्नीचा खून

चारित्र्याच्या संशयावरून अपशिंगे येथे पत्नीचा खून

Published On: May 28 2018 1:33AM | Last Updated: May 28 2018 12:55AMकोरेगाव :  प्रतिनिधी 

अपशिंगे, ता. कोरेगाव येथे चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून करण्यात आला. कुर्‍हाडीने गंभीर वार करून पळून जाणारा संशयित पतीही नाल्यात पडल्याने गंभीर जखमी झाला असून, त्याच्या डोक्याला मोठी दुखापत झाली आहे. त्याच्यावर सातारा येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सौ. सुशीला शंकर बुधावले  (वय 50) असे मृत पत्नीचे नाव असून, संशयित पतीचे नाव शंकर जयसिंग बुधावले (वय 55) असे आहे. 

याबाबत मिळालेली माहिती अशी, संशयित आरोपी शंकर बुधावले याला दोन विवाहित मुले, सून, नातवंडे असा परिवार आहे. गेल्या काही दिवसांपासून सौ. सुशीला व शंकर या पती-पत्नीमध्ये वाद सुरू होता. चारित्र्याच्या संशयावरून या दोघांमध्ये वारंवार भांडणाचा खटका उडत होता.  रविवारीही त्यांच्यामध्ये याच कारणावरून भांडण झाल्याचे समजते. त्यातच शंकरने संतापाच्या भरात सुशीलावर कुर्‍हाडीने वार केले. त्यामुळे त्या रक्ताच्या थारोळ्यात पडल्या. आपल्या हातून अघटित  घडल्याची जाणीव झाल्याने शंकर पळून जाऊ लागला; मात्र नाल्यानजीक असणार्‍या खड्ड्यात अडखळून पडल्याने संशयीत आरोपी शंकरच्या  डोक्याला गंभीर जखम झाली. गंभीर जखमी दोघांनाही सातारा येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. औषधोपचारादरम्यान  सौ सुशिला बुधावले यांचा मृत्यू झाला. 

घटनेची नोंद रहिमतपूर पोलिस ठाण्यात झाली असून संशयीत आरोपी शंकर जयसिंग बुधावले याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.  अधिक तपास स.पो.नि. श्रीगणेश कानुगडे करत आहेत.