Tue, Jul 23, 2019 06:50होमपेज › Satara › घरकुल योजनेच्या यादीत मोठा घोळ

घरकुल योजनेच्या यादीत मोठा घोळ

Published On: Mar 05 2018 1:45AM | Last Updated: Mar 04 2018 10:46PMचाफळ : वार्ताहर

वीस ते पंचवीस एकर जमीन... रहायला आलिशान बंगला पंतप्रधान घरकूल योजनेच्या यादीत नाव. एकीकडे अशी स्थिती असताना ज्यांना घरकुल आवश्यक आहे, ते लोक मात्र वंचित राहिल्याचा दावा पाडळोशी (ता. पाटण) येथील ग्रामस्थांनी केला आहे. आ. शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत झालेल्या जनता दरबारमध्ये ग्रामस्थांनी याबाबतची तक्रार प्रशासकीय अधिकार्‍यांकडे करत पुन्हा सर्व्हे करण्याची मागणी केली आहे. त्यामुळेच प्रशासन आता कोणती भूमिका घेणार याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागून राहिले आहे.

चाफळ विभागातील पाडळोशी ग्रामपंचायत अतंर्गत येणार्‍या  नारळवाडी, मसुगडेवाडी, तावरेवाडी,  मुसळेवाडी या चार वाड्यावस्त्यांवर चार महिन्यापूर्वी शासकीय अधिकार्‍यांकडून पाहणी करण्यात आली होती. ‘ज्यांना राहिला घरे नाहीत, अशा लोकांची माहिती घेत सर्व्हे करण्यात आला होता. त्यामुळे गोरगरिबांना न्याय मिळेल, अशी आशा पल्लवीत झाली होती. त्यानंतर काही दिवसांपूर्वी पंतप्रधान घरकुल योजनेसाठी पात्र लाभार्थी लोकांची यादी प्रसिद्ध झाली. मात्र ही यादी पाहिल्यानंतर ग्रामस्थांना धक्काच बसला असून असे कसे होऊ शकते? असा प्रश्‍न ग्रामस्थांकडून उपस्थित होत आहे.

ज्यांना खरोखरच राहण्यासाठी घर नाही आणि जे लोक सध्या पडक्या घरात राहत आहेत, त्यांचीही नावे प्रसिद्ध केलेल्या यादीमध्ये समाविष्ट नाहीत. गावातील नारायण ढेरे, रामचंद्र पवार, बाळासो पवार, गणपत पवार, आनंदराव ढेरे, जगन्नाथ निकम, रंजना निकम, बाजीराव चव्हाण, समाधान सुतार, दिलीप काकडे, शशिकांत ढेरे यांना खरोखरच घरकूल योजनेचा लाभ मिळणे गरजेचे आहे. मात्र असे असतानाही त्यांची नावे या यादी नाहीत. मात्र याउलट ज्यांना राहण्यासाठी घर आहे, भरपूर शेतीसह आलिशान घरे आहेत, अशा लोकांची नावे यादीत समाविष्ट झाली आहेत. त्यामुळेच ही यादी रद्द करून नव्याने सर्व्हे करणे आवश्यक आहे. तसेच या  फेरसर्व्हेतून गोरगरिबांना न्याय मिळावा, अशी मागणी निवेदनाद्वारे जनता  दरबारमध्ये ग्रामस्थांनी केली आहे.