होमपेज › Satara › सातारच्या चार भिंतीवर ‘ओपन बार’

सातारच्या चार भिंतीवर ‘ओपन बार’

Published On: Aug 01 2018 1:36AM | Last Updated: Jul 31 2018 11:32PMसातारा : योगेश चौगुले

राजधानी साताराच्या चार भिंतीवरील ऐतिहासिक स्मारक अनेक समस्यांच्या गर्तेत सापडले आहे. हा चार भिंती परिसर आता ‘ओपन बार’ बनला आहे. या परिसरात प्रेमी युगलांसह मद्यपींनी उच्छाद मांडला आहे. परिसराची अस्वच्छता व पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने स्थानिक नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.

सातारा हे ऐतिहासिक शहर आहे. अजिंक्यतारा किल्ल्याकडे जाताना चार भिंतीची वास्तू आहे. या ठिकाणावरुन एका बाजूला सातारा शहराचे दर्शन होते, तर दुसरीकडे अजिंक्यतारा किल्ला आहे.  चार भिंती म्हणजे 1830 मध्ये छत्रपती प्रतापसिंह महाराज यांनी चार भिंती ही ऐतिहासिक वास्तू बांधल आहे. या स्थानाला ‘नजर बंगला’ असेही म्हटले जाते. विजयादशमी (दसरा) उत्सवा दरम्यान छत्रपतींच्या कुटुंबातील स्त्रियां छत्रपतींची दसर्‍याची स्वारी या इमारतीमधून पाहत असत. या ठिकाणी 1857 च्या स्वातंत्र्यलढ्याच्या लढाऊ जहाजाचे स्मरण करण्यासाठी उभारलेले एक स्मारकही आहे. यावर राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे, रंगो बापूजी गुप्ते तसेच हौतात्म्य पत्करणार्‍या अनेक शूरविरांच्या स्मरणार्थ सन 1957 मध्ये शाहूनगर वासियांनी स्मृती स्तंभाची उभारणी केली. या स्मृती स्तंभाचे व चार भिंतीचे नुतनीकरण 1 मे 2001 मध्ये करण्यात आले आहे.

सातारचा ऐतिहासिक वारसा सांगणारे हे स्मृती स्थळ व चार भिंती आज प्रशासनाकडून दुर्लक्षीत झाल्या आहेत. चार भिंती परिसरात तरुणाईने उच्छाद मांडला आहे. प्रेमी युगलांसह मद्यपींना अड्डा बनवला आहे. येथील प्रवेशद्वारा पासूनच अस्वच्छतेचे दर्शन होते. स्मृती स्थळाजवळ प्रेमी युगलांचे अश्‍लील चाळे चालतात. त्यामुळे स्थानिक नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. चार भिंती परिसर शहरातील मद्यपींनी आपला आड्डा बनवला आहे. या ऐतिहासिक चार भिंती परिसरात खुले आम ते मद्य प्राशन करताना दिसत आहेत. संपूर्ण भिंतीवर दारुच्या बाटल्यांचा खच पडला आहे. परिसरात प्लास्टिक कचरा, पाण्याच्या मोकळ्या बाटल्या, ग्लास अस्ताव्यस्त पडल्याने या ऐतिहासिक वास्तूला उतरती कळा लागली आहे. खुले आम दारु पिवून धिंगाना घालणार्‍या टोळक्यांबरोबर अश्‍लिल चाळ्यांच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.