Sat, Feb 16, 2019 04:40होमपेज › Satara › डोंगररांगा काळवंडल्या...

डोंगररांगा काळवंडल्या...

Published On: Apr 13 2018 1:19AM | Last Updated: Apr 12 2018 10:04PMसातारा : प्रतिनिधी

हिरव्यागार झाडाझुडपांनी बहरलेल्या डोंगररांगा हेच जिल्ह्याचे वैभव आहे. हे वैभव टिकवण्याची जबाबदारी सर्वांचीच असली तरी वन विभागाच्या कारभाराबाबत संतप्त भावना आहेत. वारंवार लागणार्‍या वणव्यामुळे डोंगररांगा काळवंडून गेल्याचे चित्र ठिकठिकाणी दिसत आहे. 

सातारा शहर परिसरातील अजिंक्यतारा किल्ला, पेढ्याचा भैरोबा, यवतेश्‍वर घाट अशा  डोंगरांवर आगीचे लोळ उठत आहेत. या भिषण  आगीत वाळक्या गवताची जळून राख झाली, लहान-मोठ्या वनऔषधी करपत आहेत. लहान-मोठ्या  वन्यप्राण्यांची निवास्थाने नष्ट होवून चिमुकल्या प्राण्यांची पिले होरपळून जात आहेत. दरवर्षी वनविभागाच्या अखत्यारित्यामधील क्षेत्रामध्ये वनवे लागत आहेत. वणवे रोखण्यासाठी वनविभागाकडून कोणतीही ठोस भूमिका घेतली जात नसल्याने जिल्ह्यातील कुठलाच डोंगर वनव्यापासून सुरक्षित राहिला नाही. दरवर्षी वनविभागाकडून लाखो रुपये खर्चन वृक्षलागवड केली जाते. मात्र उन्हाळ्यात वनविभागाच्या हद्दीत वनवा लागल्याने या वृक्षाची होळी होऊन कोट्यवधी रुपयांच्या शासकीय निधीचीही राख होत आहे. 

वणवा लावणार्‍यास सक्‍तमजुरी

वणवा लावल्याचे सिद्ध झाल्यास वनकायद्यानुसार संबंधितास 10 वर्ष सक्तमजूरीची शिक्षा होवू शकते. तसेच वणव्यामुळे जंगलाचे झालेल्या नुकसानीची वसुली केली जाते. मात्र वनविभाग वनव्याप्रकरणी अज्ञातावर गुन्हे दाखल करुन रिकामे होत आहे. अशा अज्ञातांवर कधी कारवाई झाली नाही. कारवाई होत नसल्यानेच वनव्याच्या घटना दरवर्षी घडतात. 

निसर्गचक्रात परिवर्तन

डोंगरामध्ये लहान-मोठी झाडेझुडपे, हिरवेगार गवत, वृक्षवेली असल्याने डोंगरावर ससे, तरस, लांडगा, कोल्हे, रानडुक्कर, लांडोर, मोर, अगदी वाघ आणि बिबट्यासारखे लहान-मोठ्या प्राण्यांचा वावर असतो. मात्र वणव्यामुळे जंगलातील प्राणी, झाडेझुुडपे, वनऔषधी वनस्पती होरपळून नष्ट होतात. 

वनव्यामुळे जमिनीतील सेंंद्रिय घटक नष्ट होतात. जनावरांना चार्‍यासह पिकावरील कीड नष्ट करणार्‍या पक्ष्यांची अंडी, घरटी, पिल्ले जळून नष्ट होतात. यामुळे निसर्गचक्रात परिवर्तन होते. वंन्यप्राण्यासह जीवसृष्टीचा र्‍हास होत असून तो टाळण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.