Mon, Mar 25, 2019 03:03
    ब्रेकिंग    होमपेज › Satara › तासवडे परिसरात वादळी पाऊस

तासवडे परिसरात वादळी पाऊस

Published On: Apr 17 2018 1:51AM | Last Updated: Apr 16 2018 11:24PMतासवडे टोलनाका : वार्ताहर

तासवडे (ता. कराड) परिसराला सोमवारी दुपारी वादळी पावसाने झोडपून काढले. सोसाटयाच्या वार्‍यासह पावसाने थैमान घालत प्रचंड नुकसान केले. वादळी वार्‍यामुळे झाड कोसळल्याने तासवडे-शिरवडे रस्त्यावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. वीज वाहक तारा तुटल्या. अनेकांच्या घरावरील पत्रे उडाल्याने मोठे नुकसान झाले. झाड अंगावर कोसळत असताना मोटारसायकल तेथेच सोडून दोघे पळाल्याने त्यांचे जीव वाचले. 

बेलवडे, तळबीड, वहागावसह परिसरात सकाळपासूनच वातावरणात प्रचंड उष्णता जाणवत होती. उकाड्यामुळे लोक हैराण झाले होते. दुपारी दोनच्या सुमारास वातावरणात बदल झाला.  सोसाट्याचा वारा सुटला. विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगाडाटांसह मुसळधार पावसास सुरुवात झाली. 

सोसाट्याच्या वार्‍यासह पडणार्‍या पावसाने परिसराला झोडपून काढले.
शेतातून गडबडीने घराकडे निघालेले रामचंद्र पवार, लखन पवार  यांचे नशीब बलवत्तर म्हणून  अगांवर  बाभळीचे झाड पडत असताना त्यांनी मोटारसायकल तेथेच सोडून सुरक्षित ठिकाणी आसरा घेतला. 
वार्‍यामुळे तासवडे, शिरवडे रस्तावरील  एक  मोठे झाड जमीनदोस्त झाले. तासवडे गावातून जाणार्‍या वीज वाहक तारा तुटल्या. त्यामुळे वीज पुरवठा खंडीत झाला. 

शिवाजी सखाराम जाधव, संजय भानुदास जाधव यांच्या जनावरांच्या शेडवरील पत्रे उडून इतरत्र पडले. तसेच नितीन जाधव यांच्या बंगल्यावरील सोलर सिस्टिम बंगल्या वरून पाण्याच्या टाकीत पडल्यामुळे मोठे नुकसान झाले.  मोठे झाड तासवडे- शिरवडे रस्त्यावर कोसळल्याने  त्या मार्गावरील वाहतूक दोन अडीच तास ठप्प झाली होती.   

यावेळी तासवडेचे सरपंच बाजीराव जाधव, शिवाजी जाधव व संजय जाधव यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून युवकांना सोबत घेऊन झाडाच्या फांद्या तोडून वाहतूक सुरळीत केली. वादळी पावसाने सर्वत्र हाहाकार उडाला. 


Tags : heavy rain ,tasavde ,satara news