Tue, May 21, 2019 18:58होमपेज › Satara › गारा, वादळीवार्‍यासह जोरदार पाऊस

गारा, वादळीवार्‍यासह जोरदार पाऊस

Published On: Apr 18 2018 12:56AM | Last Updated: Apr 17 2018 10:54PMसातारा : प्रतिनिधी

जिल्ह्यामध्ये मंगळवारी बहुतांश ठिकाणी वादळीवार्‍यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. बामणोलीमध्ये गारांसह दमदार पाऊस पडला. वाई, महाबळेश्‍वर, जावली आणि सातारा तालुक्यांत पावसाने हजेरी लावली.

सातारा शहर आणि परिसरात दुपारपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले होते.  दुपारी 4 च्या सुमारास पावसाचा शिडकावा झाला, तर वाई तालुक्यातही काही वेळ पावसाने हजेरी लावली. जावली तालुक्यातील बामणोली भागात मुसळधार गारांचा पाऊस पडला. त्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला होता, तर महाबळेश्‍वरमध्ये सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली होती. दरम्यान, पावसाच्या आगमनाने उन्हाच्या काहिलीपासून नागरिकांना काहीअंशी दिलासा मिळाला. 

महाबळेश्‍वरात हलक्या सरी

महाबळेश्‍वर शहर व परिसरात मंगळवारी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या तर काही भागांमध्ये मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे हवेमध्ये गारवा निर्माण झाल्याने उन्हाच्या काहिलीपासून नागरिकांना काही वेळ सुटका मिळाली. वातावरणातील या बदलामुळे स्थानिकांसह पर्यटक सुखावले आहेत. 

महाबळेश्‍वर शहरामध्ये काही दिवसांपासून तापमानामध्ये वाढ झाली होती. परंतु, दररोज दुपारनंतर वातावरण ढगाळ होत होते. फक्‍त सोसाट्याचा वारा वाहत नसल्याने पावसाने हुलकावणी दिली. मात्र, मंगळवारी दुपारी ढगांच्या कडकडाटामध्ये पावसाला सुरूवात झाली. दिवसभर पावसाची रिपरिप सुरूच होती. यामुळे हवेत गारवा निर्माण झाल्याने उकाडयाने हैराण झालेल्या पर्यटक व नागरिकांना दिलासा मिळाला. शहरात जरी हलक्या सरी कोसळल्या असल्या तरी तापोळा, मांघर, मेटतळे, लिंगमळा, माचुतर या भागात मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे काही भागात पाणीच पाणी झाले होते. मात्र, या पावसाने कोठेही नुकसान झालेले नाही.

कास पठारावर गारा

बामणोली : सातारा शहराच्या पश्‍चिमेला असणार्‍या यवतेश्‍वर व कास पठार परिसरात वादळी वार्‍यासह गारांचा मुसळधार पाऊस पडला. सांबरवाडी, जांभूळमुरे, आनावळे, पिसानी, पेट्री, अंबाणी, देवकल, पारंबे फाटा या परिसरात वादळी वारे  गारांसह मुसळधार पाऊस पडला. पेटेश्‍वरनगर शाळेजवळ रस्त्यालगत झाड कोसळल्याने काही काळ भीतीचे वातावरण पसरले होते. दोन दिवसांपासून उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना यामुळे दिलासा मिळाला आहे.

पाचगणीत हलक्या सरी

पाचगणी : पाचगणी व शहर परिसरात मंगळवारी सायंकाळी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. पाचगणीसोबत भिलार, अवकाळी, गुरेघरसह तायघाट परिसरात मुसळधार पाऊस पडल्याने अल्हाददायक वातावरण तयार झाले होते. या पावसामुळे स्थानिक आणि पर्यटकांना उन्हाच्या काहीलीपासून थोडा फार दिलासा मिळाला. या पावसामध्ये पर्यटकांनी पावसात भिजण्याचा आनंद घेतला. या पावसामुळे रानमेवा व स्ट्रॉबेरीला तडाखा बसल्याने शेतकर्‍यांचे नुकसान होणार आहे.

औंधसह परिसरात हजेरी

औंध : औंधसह परिसरात मंगळवारी दुपारी व सायंकाळी पावसाच्या जोरदार  सरी कोसळल्या.मंगळवारी सकाळपासून हवेत कमालीचा उष्मा जाणवत होता. दुपारी तीनच्या सुमारास मेघगर्जनेसह सुमारे वीस मिनिटे पावसाच्या चांगल्या सरी कोसळल्या. अचानक आलेल्या पावसामुळे औंध येथील आठवडी बाजारामध्ये आलेले विक्रेते, शेतकरी, व्यापारी, ग्राहक, खरेदीदार, महिला वर्गाची चांगलीच तारांबळ उडाली होती. या पावसामुळे हवेतील उष्मा कमी होण्यास मदत झाली.त्यानंतर सायंकाळी सातच्या सुमारास  पुन्हा पावसाच्या सरी कोसळल्या. हा पाऊस औंध परिसरातील अनेक भागांमध्ये पडला. या पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

म्हसवडमध्ये वादळी वार्‍यासह पाऊस

म्हसवड : प्रतिनिधी
म्हसवड व परिसरामध्ये मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास मेघगर्जना विजेचा कडकडाड व वादळी वार्‍यासह पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे शहरवासियांची त्रेधातिरपिट उडाली तर ग्रामीण  भागात  श्रमदानातून केलेले बडिंग भरून गेल्याने समाधान व्यक्त होत आहे. म्हसवड व परिसरातील वरकुटे -म्हसवड, वाकी, भाटक, रांजणी,  वडजल, कुक्कुडवाड, ढाकणी, विरळी,  वळई, पुळकोटी, गंगोती, दिवड, हिंगणी, धुळदेव, देवापूर,  वरकुटे आदी गावांमध्ये वादळी वार्‍यासह पावसाने हजेरी लावली. जोराचा वारा सुटल्याने लोकांची चांगलीच तारांबळ उडाली. सध्या तालुक्यातील अनेक गावात श्रमदानातून जलसंधारणाची कामे सुरू आहेत. त्याठिकाणी वरूणराजाने हजेरी लावल्याने श्रमदानाचे चीज झाल्याची भावना व्यक्त होत आहे.

विडणीत विजांचा कडकडाट

विडणी : वार्ताहर
विडणी परिसरात मंगळवारी सायंकाळी विजेच्या कडकडाट व जोरदार वार्‍यासह पावसाने हजेरी लावली. दरम्यान शेतकर्‍यांनी शेतातून काढून ठेवलेला कांदा पावसात भिजल्याने नुकसान झाले. विडणी परिसरात दिवसभर उकाड्याने नागरिक हैराण झाले होते. मात्र, सायंकाळी साडेपाच वाजता संपूर्ण विडणी व परिसरात वीजेच्या कडकडाट व जोरदार वार्‍यासह पावसाने हजेरी लावल्याने हवेत गारवा निर्माण झाला.

सध्या मोठ्या प्रमाणात कांदा काढणी सुरू असून अचानक झालेल्या पावसाने शेतकर्‍यांची मात्र पळापळ  झाली. बरेच शेतकरी शेतातून आपला कांदा ट्रॅक्टरच्या साह्याने शेडमध्ये ठेवत होतेे. मात्र, अनेक शेतकर्‍यांचा काढलेला कांदा तसाच पावसाने शेतात भिजून राहिल्याने हजारो रुपयांचे नुकसान झाले.