Fri, Jul 03, 2020 21:36होमपेज › Satara › पावसामुळे 38 हजार हेक्टर शेती उद्ध्वस्त

पावसामुळे 38 हजार हेक्टर शेती उद्ध्वस्त

Published On: Aug 14 2019 12:08AM | Last Updated: Aug 14 2019 12:08AM
सातारा : प्रतिनिधी

जिल्ह्यात गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे आलेल्या पुराने  तसेच शेतात पाणी साचून राहिल्याने अतोनात नुकसान झाले आहे. महसूल विभाग तसेच कृषी विभागाने नजर अंदाजाने केलेल्या सर्वेक्षणानुसार जिल्ह्यात 38 हजार 224.99 हेक्टर शेतीचे नुकसान झाल्याचे प्राथमिक अहवालावरून स्पष्ट होत आहे. दरम्यान, पुरामुळे महिनाभरात 5 व्यक्‍तींचा मृत्यू झाला असून लहान-मोठी 22 जनावरे दगावली आहेत, तर 2895 घरांची पडझड झाली आहे. 

जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्याने नद्यांना पूर आला. नदीकाठच्या गावांमध्ये पाणी घुसले. दुर्गम भागात जमिनी खचण्याचे प्रकार वाढले. त्यामुळे  पूरग्रस्तांचे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर करावे लागले. जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांच्या मार्गदर्शनाखाली मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. सातारा तालुक्यातील 3 व्यक्‍तींचा मृत्यू झाला. या तालुक्यात 569 घरांची अंशत: पडझड झाली. बाधितांना 2 हजार 560 क्‍विंटल गहू, 2 हजार 560 क्‍विटल तांदूळ व 1 हजार 280 लिटर रॉकेलचे वाटप करण्यात आले. जावळी तालुक्यातील 227 घरांची अंशत: पडझड झाली आहे. बाधितांना 730 क्‍विंटल गहू व तांदळाचे वाटप करण्यात आले. कराड तालुक्यातील 3 जनावरे दगावली. या तालुक्यात 450 घरांची अंशत: पडझड झाली आहे. बाधितांना 4 हजार 400 क्‍विंटल गहू व तांदळाचे वाटप करण्यात आले. 2 हजार 200 लिटर रॉकेल पुरवण्यात आले. 2 हजार 100 कोंबड्याही मृत पावल्या.  पाटण तालुक्यातील 10 जनावरे मृत्यूमुखी पडली असून 986 घरांची अंशत: पडझड झाली. बाधितांना 3 हजार 760 क्विंटल गहू व तांदूळ तसेच 1 हजार 880 लिटर रॉकेलचे वाटप करण्यात आले. वाई तालुक्यातील 300 घरांची अंशत: पडझड झाली. 4 घरे जमीनदोस्त झाली. या तालुक्यात 1 हजार 120 क्विंटल गहू व तांदूळ तसेच 560 लिटर रॉकेलचे वाटप करण्यात आले. महाबळेश्‍वर तालुक्यात एकाचा मृत्यू झाला. तर 9 जनावरे दगावली. 71 घरांचे अंशत: नुकसान झाले. बाधितांना 450 क्‍विंटल गहू व तांदूळ तसेच 225 लिटर रॉकेलचे वाटप करण्यात आले. खंडाळा तालुक्यात एकाचा मृत्यू झाला. 282 घरांची अंशत: पडझड झाली. फलटण तालुक्यातील 6 घरांची अंशत: पडझड झाली असून बाधितांना 80 क्‍विंटल गहू व तांदूळ तसेच 40 लिटर रॉकेलचे वाटप करण्यात आले. जिल्ह्यात पावसाने 5 जणांना बळी घेतला असून 22 जनावरे दगावली. 2 हजार 890 घरांची अंशत: तर 5 घरांची संपूर्ण पडझड झाली आहे. बाधितांना 13 हजार 100 क्विंटल गहू व तितक्याच तांदळाचे वाटप करण्यात आले. 6 हजार 185 लिटर रॉकेल पुरवण्यात आले. दरड कोसळणार्‍या गावातील नागरिकांचे सुरक्षित जागी स्थलांतर करण्यात आले. सातारा तालुक्यातील 4 गावांमधील 366 नागरिक, पाटण तालुक्यातील 10 गावांतील 882, जावळी तालुक्यातील 4 गावांतील 181, महाबळेश्‍वर तालुक्यातील 4 गावांतील 223 नागरिकांचा समावेश आहे. 22 गावांतील 1 हजार 652 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुनील बोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी विभागाकडून पंचनामे सुरु झाले आहेत. सर्वेक्षण पूर्ण करुन शासनास अंतिम अहवाल सादर करण्यात येणार आहे. शासन नियमानुसार देय अनुदान शेतकर्‍यांना लवकरात लवकर  देण्याबाबत दक्षता घेण्यात येत असल्याचेही बोरकर यांनी सांगितले आहे.  सातारा तालुक्यातील अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या गावातील बाधीत झालेल्या लहान व मोठ्या जनावरांना तसेच जनवारांचा गोठा, कोंबड्या इत्यादीसाठी शासनाने मदत जाहीर केली आहे एका लाभार्थीसाठी जास्तीत जास्त तीन दुधाळ जनावरांसाठी 30 हजार, शेळ्या मेंढ्यांसाठी 30 हजार, जास्तीत जास्त 30 शेळ्या, शेतीकाम करणार्‍या जनावरांसाठी 25 हजार  तर जास्तीत जास्त 3 जनावरे, छोटी जनावरे 16 हजार व  जास्तीत जास्त 6 जनावरे, प्रती कोंबडी 50 रुपये तर जास्तीत जास्त 5 हजार रुपये,  जनावरांच्या गोठ्याची पडझड झाली असेल तर 21 हजार रुपयांची मदत केली जाणार असल्याची  माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त अंकुश परिहार यांनी दिली.