Mon, Apr 22, 2019 16:05होमपेज › Satara › गणेशवाडी ग्रामस्थांचे रात्रंदिवस श्रमदान

गणेशवाडी ग्रामस्थांचे रात्रंदिवस श्रमदान

Published On: May 25 2018 1:12AM | Last Updated: May 24 2018 7:46PMऔंध : वार्ताहर

गणेशवाडी हे साडेतीनशे लोकसंख्या असलेले छोटेसे गाव. स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यानंतरही पिण्याच्या व शेतीच्या पाण्यापासून वंचित असलेले, कायम विविध भौतिक समस्यांनी ग्रासलेले गाव. यावर्षी फिनिक्स पक्ष्याप्रमाणे उभारी घेऊन पाणी फाऊंडेशनमार्फत राबविण्यात येत असलेल्या वॉटरकप स्पर्धेत उतरले आहे.रात्रीचा दिवस करून पाणी टंचाईमुक्‍त  होण्याचा ध्यास येथील ग्रामस्थ, महिलांनी केला असून श्रमदानातून येथील कामे मोठ्या प्रमाणात मार्गी लावली आहेत

ऊन्हाळा म्हटलं की तीन ते चार महिने पाण्यासाठी येथील ग्रामस्थ, महिलांची कायम भटकंती. शाश्‍वत जलस्त्रोत नसल्याने शेतीचीही ओरड त्यामुळे रोजगाराच्या संधी नाहीत. त्यामुळे येथील अनेक नागरिक पोटासाठी मुंबई, पुणे येथे कामाला आहेत. पाण्याचे संकट कायमस्वरूपी घालविण्यासाठी येथील ग्रामस्थांनी एकजुटीने वॉटरकप स्पर्धेत भाग घेण्याचा निर्णय घेतला.  पण, तोकडी लोकसंख्या व सुमारे पाच हजार घनमीटर श्रमदानाची कामे कशी पूर्ण होणार, याची तमा न बाळगता येथील ग्रामस्थ, महिला, युवकांनी 8 एप्रिल पासून कंबर कसली आहे. सकाळी सहा ते अकरा श्रमदान, दिवसभर रोजगार, सायंकाळी सहा ते आठ विश्रांती व रात्री नऊ ते पहाटे  दोन वाजेपर्यंत हॅलोजन लावून श्रमदान. या माध्यमातून सध्या विद्युत वेगाने याठिकाणी कामे सुरू आहेत.

या कामासाठी औंध येथील विविध समाजसेवी संघटनांच्या  सुमारे शंभर  युवकांनी दिवसभर आपली कामे करून रात्रीच्या श्रमदानात सहभाग घेऊन औंधचाच छोटा भाऊ असलेल्या गणेशवाडीला पाणी टंचाई मुक्‍त करण्याचा निर्धार केला आहे. यामध्ये महिलावर्गही श्रमदानात हिरीरीने सहभागी होत आहे. त्याचबरोबर मुंबई, पुणे येथे नोकरीस असणार्‍या चाकरमान्यांनी मायभूमीसाठी वेळ मिळेल तसे येऊन श्रमदान केले आहे.खटाव तालुक्याच्या पश्‍चिम पट्टयातील गणेशवाडीसह, करांडेवाडी, खबालवाडी, वडी, गोपूज याठिकाणी वॉटरकपची कामे सुरू असून सर्वच ठिकाणी कामांची रस्सीखेच सुरू असून स्पर्धेत कोण बाजी मारणार? याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.