Tue, Jul 23, 2019 18:58होमपेज › Satara › दिव्यांग व्यक्‍तींना त्रास दिल्यास कारावास

दिव्यांग व्यक्‍तींना त्रास दिल्यास कारावास

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सातारा : प्रतिनिधी

दिव्यांगांसाठी केंद्र सरकारने खुशखबर दिली आहे. त्यांना सन्मानाने जीवन जगता यावे यासाठी केंद्र सरकारने कायदा लागू केला असून त्याची काटेकोर अंमलबजावणी देखील करण्यात येत आहे.   प्रतिकूल परिस्थितीत जीवन जगणार्‍या दिव्यांगांना त्रास देणार्‍या अथवा अपमानास्पद वागणूक देणार्‍यांवर यापुढे अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा नोंद होवून त्याकरता दंड व सहा महिने ते पाच वर्षापर्यंतची सक्‍त कारावासाची शिक्षा ठोठावण्याची तरतूद या कायद्यात असल्याने दिव्यांगांना दिलासा मिळाला आहे. 

याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, दिव्यागांसाठी त्रास देणार्‍यास कारावासाची शिक्षा ठोठावणारा कायदा (दि राईटस् ऑफ परसनस् विथ डिसअ‍ॅबिलिटीस अ‍ॅक्ट 2016) नुकताच केंद्र सरकारने पारीत केला आहे, त्यामधील कलम 92 अन्वये सदरच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. या कायद्यात दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासाबरोबरच सुरक्षेचा देखील अंतर्भाव केला आहे. त्यामुळे यापुढील काळात दिव्यांगांना  समाजाकडून सन्मानाची वागणूक प्राप्त होईल. या धोरणात्मक निर्णयामुळे देशातील असंख्य दिव्यांगांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

समाजाच्या विविध स्तरावर कार्यरत असणा-या दिव्यांगांना अनेकदा असंख्य अडचणी व समस्यांना सामोरे जावे लागते. अनेकदा अपप्रवृत्तीकडून धमक्या त्याचप्रमाणे मानसिक व शारिरीक त्रास दिला जात असल्याच्या असंख्य तक्रारी राज्य व केंद्र सरकारकडे प्राप्त झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. अपमानास्पद वागणूक देणे, शारीरिक व मानसिक छळ करणे, धमकी देणे त्यांना आधार देणार्‍या साधनांना मुद्यामहून त्रास देणे अशा बाबतीतही कडक शिक्षेची तरतूद  कायद्यात केली आहे.

दिव्यांगांना शिक्षण, नोकरी व व्यवसायामध्ये विेशेष सवलत, आरक्षण व आर्थिक अनुदान  याचाही समावेश या कायद्यात करण्यात आला असून त्यामुळे या व्यक्‍तीदेखील स्वत:च्या पायावर ठामपणे उभे राहू शकतील. केंद्र सरकारच्या या धाडसी निर्णयामुळे दिव्यांगांमध्ये सुरक्षिततेची भावना वाढीला लागलेली आहे. या विधेयकामध्ये दिव्यांग महिलांचा अवमान अथवा औचित्यभंग केल्यास सक्‍त कारवाईची तरतूदही करण्यात आली आहे.