Mon, May 20, 2019 08:35होमपेज › Satara › सातारा जिल्हा परिषदेचे काम राज्याला मार्गदर्शक  : चंद्रकांत दळवी

सातारा जिल्हा परिषदेचे काम राज्याला मार्गदर्शक  : चंद्रकांत दळवी

Published On: Apr 27 2018 1:09AM | Last Updated: Apr 26 2018 10:30PMसातारा : प्रतिनिधी

पंचायतराज व्यवस्थेत स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राची घडी बसवली तीच सातारा जिल्हा परिषद महाराष्ट्रामधील जिल्हा परिषदांना मार्गदर्शकाची भूमिका बजावण्यात आदर्शवत ठरली असल्याचे उद‍्गार सेवानिवृत्त विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी काढले. 

सातारा जिल्हा परिषदेच्यावतीने स्वर्गीय यशवंतराव चव्हाण बहुद्देशीय सभागृहात चंद्रकांत दळवी यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जि.प. अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल, कृषी सभापती मनोज पवार, समाजकल्याण सभापती शिवाजी सर्वगोड, महिला व बालकल्याण सभापती वनिता गोरे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे. जि.प. पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.

चंद्रकांत दळवी म्हणाले, केंद्र व राज्य शासनाने अंमलात आणलेल्या योजनांमुळे  गावागावांमध्ये चांगल्याप्रकारे कामे होवू लागली आहेत. महाराष्ट्रात  जलसंधारणाचे सर्वात जास्त काम सातारा जिल्ह्यात झाले आहे. जलयुक्त शिवार, सत्यमेव जयते  वॉटर कप स्पर्धेमुळे गावोगावी नागरिकांना प्रेरणा मिळाली. गाव विकासात नागरिक मागचे सर्व हेवेदावे  विसरून एकत्र येवू लागले आहेत. जलसंधारणाच्या कामासाठी ग्रामीण भागातील शक्ती जागृत झाली आहे. जलयुक्त शिवार नंतर पुढे काय? हा प्रश्‍नही समोर येत आहे. 

ग्रामविकासात सर्व ग्रामस्थांनी एकी दाखवून गावाचा आराखडा तयार करून कामे केली तर पुढील 10 वर्षात निढळसारखी गावे निर्माण होतील. निढळला राज्याच्या विविध ठिकाणच्या ग्रामस्थांनी भेट दिल्यानंतर त्या गावांमध्ये कामे सुरू केली आहेत.अशा गावांना भेटी देवून तेथे काम करताना येणार्‍या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. झिरो पेन्डन्सी सर्वच विभागात चांगल्या पध्दतीने मुरलेली आहे.झिरो पेन्डन्सी व डेली डिस्पोजल संकल्पना नागरिकांचे प्रश्‍न सोडवून कर्मचार्‍यांना तणावमुक्त करते. 

संजीवराजे ना. निंबाळकर म्हणाले, चंद्रकांत दळवी यांनी संपूर्ण महाराष्ट्राला दिशा दाखवणारी धोरणे निर्माण करून ती धोरणे महाराष्ट्रासह देशाने विकसीत केली. ग्रामीण भागातील जनता डोळ्यासमोर ठेवून त्यांनी ग्रामविकासाची कामे केली. संपूर्ण राज्यात जलसंधारणाची जास्त कामे निढळमध्ये झाली आहेत. त्यांनी अनेक योजना आणल्या  आणि त्या यशस्वी करून दाखवल्या.  चंद्रकांत दळवी यांनी आणलेल्या  स्वच्छता अभियानामुळे गावेच्या गावे एकत्रीत आली. निढळचा आदर्श घेवून अनेक गावे त्यांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करत आहेत.

जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल म्हणाल्या,चंद्रकांत दळवी यांनी झिरो पेन्डन्सी व डेली डिस्पोजलमध्ये राज्यात आदर्शवत काम केले आहे. आदर्श गाव घडविण्यात दळवी यांचा सिंहाचा  वाटा आहे. जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग व पुनर्वसनाचे प्रश्‍न   चंद्रकांत दळवी यांच्यामुळे मार्गी लागले आहेत. आता सातार्‍यासाठी नवीन प्रेरणा घेवून दिशा देण्यासाठी त्यांनी  मार्गदर्शकाची भुमिका बजवावी.

डॉ. कैलास शिंदे म्हणाले,चंद्रकांत दळवी यांचे काम प्रत्येकाला नेहमीच दिशा देणारे राहिले आहे. प्रशासनामधील डिझायन इंजिनिअर म्हणून चंद्रकांत दळवी यांना ओळखले जात आहे.त्यांनी विविध योजनांमधून प्रशासनाचे डिझायनींग केले आहे. 

यावेळी   वनिता गोरे, जि.प. सदस्य भीमराव पाटील, माणचे सभापती रमेश पाटोळे,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पाटील,प्रकल्प संचालक नितीन थाडे, डॉ. चांगदेव बागल, डॉ. भगवान पवार, काका पाटील, प्रशांत तुपे, उध्दव फडतरे, खशाबा जाधव, शिंदे, पदाधिकारी व कर्मचार्‍यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी श्री व सौ. दळवी यांचा संत ज्ञानेश्‍वराची मूर्ती देवून  सत्कार करण्यात आला. यावेळी  जिल्हा परिषद, पंचायत समितीचे सदस्य, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. उपमुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजीत बडे यांनी प्रास्तविक केले.