Sat, May 25, 2019 22:59होमपेज › Satara › २६ जानेवारीला ग्रामसभा घेण्याची कायद्यातच तरतूद : सीईओ

२६ जानेवारीला ग्रामसभा घेण्याची कायद्यातच तरतूद : सीईओ

Published On: Jan 23 2018 10:52PM | Last Updated: Jan 23 2018 10:30PMसातारा : प्रतिनिधी

कायद्यामध्ये दि. 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनी ग्रामसभा घेण्याची तरतूद आहे. त्यामुळे या ग्रामसभांवर संबंधित शासकीय कर्मचार्‍यांनी बहिष्कार न टाकता सभा घ्याव्यात, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी केले आहे.

झेडपीच्या ग्रामपंचायत विभागामार्फत सर्व पंचायत समितीच्या गटविकास अधिकार्‍यांना या ग्रामसभेबाबत पत्र काढण्यात आले आहे. ग्रामपंचायत नियमानुसार प्रत्येक वित्तीय वर्षाच्या सुरूवातीनंतर दोन महिन्याच्या आत, प्रत्येक वर्षाच्या नोव्हेंबर महिन्यात, ऑगस्ट महिन्यात व 26 जानेवारी अशा चार ग्रामसभा घेण्याची कायद्यात तरतूद आहे. त्यानुसार दि. 26 जानेवारी रोजी ग्रामसभा घेणे बंधनकारक आहे. नियमातील ही तरतूद आपल्या अखत्यारितील सर्व ग्रामपंचायती, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांच्या तत्काळ निदर्शनास आणून द्यावी. सातारा जिल्ह्यामध्ये 26 जानेवारी रोजी सर्वच्या सर्व 1 हजार 496 ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभांचे आयोजन करण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच ग्रामसभेमध्ये ग्रामपंचायत वार्षिक विकास आराखडा, विकास आराखड्यातील आर्थिक व भौतिक कामांचा आढावा,  आपले सरकार सेवा केंद्र, रोजगार हमी योजना, शालाबाह्य मुलांबाबत चर्चा, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत जिल्हास्तरावर  अपिलेट समिती मान्यता, मिशन अंत्योदय योजना,  राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रम आदी विषय घेण्याची सूचना करण्यात आली  आहे. ग्रामसभा कार्यवाहीबाबतचा अहवाल दि. 26 रोजी 5 वाजेपर्यंत कार्यालयास सादर करण्याच्या  सूचनाही डॉ. कैलास शिंदे यांनी दिल्या आहेत.