Wed, Apr 24, 2019 15:49होमपेज › Satara › शासनाचे दुर्लक्षाने पाण्याची नासाडी; पाणी टंचाईची निर्माण झाली भीती

घोलपवाडी पाझर तलावाला गळती 

Published On: Dec 25 2017 1:18AM | Last Updated: Dec 24 2017 10:34PM

बुकमार्क करा

मसूर : वार्ताहर

सधन म्हणून ओळखल्या जाणार्‍या मसूर पूर्व भागावर नेहमीच निसर्गाची वक्रद‍ृष्टी राहिली आहे. मात्र, असे असूनही घोलपवाडी येथील पाझर तलावातील गळतीकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे. विशेष म्हणजे गेल्यावर्षी गळती काढण्याचे काम झाले होते. मात्र, त्यानंतरही गळती सुरूच असल्याने घोलपवाडी, निगडी, चिखली, मसूर, हणबरवाडी या गावांवर पाणी टंचाईचे संकट ओढवण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

यावर्षी मसूर परिसरासह संपूर्ण तालुक्यात समाधानकारक पाऊस झाला आहे. त्यामुळेच घोलपवाडी तलाव पूर्णपणे भरला असून शेतीचा तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न दरवर्षीइतका भयावह होणार नाही, अशी अपेक्षा परिसरातील ग्रामस्थांना होती. मात्र गळतीमुळे ग्रामस्थ चिंतेत सापडले आहेत. वास्तविक 15 ते 20 वर्षापूर्वी एप्रिल, मे महिन्यातही या तलावातील पाणी आटत नव्हते.

शिवसेनेचे जयवंत पाटील यांनी पाझर तलाव क्रमांक एक व दोनच्या पिचींगमधून व उत्तर बाजूला असलेल्या विहिरीतून मोठ्या प्रमाणावर गळती होत असल्याचे सांगितले आहे. त्यामुळेच पाणी वाया जात असून ऐन उन्हाळ्यात  पिकांना पाणी मिळणार नाही, अशी भीती निर्माण झाल्याचा दावा पाटील यांनी केला आहे.

तर शिवसेना कराड तालुका महिला आघाडी प्रमुख छायाताई शिंदे यांनीही याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. गतवर्षी पिचींगच्या खाली काळया मातीचा भराव घालून गळती थांबविण्यासाठी प्रयत्न झाला. मात्र तरीही पाणी गळती मोठ्या प्रमाणात सुरूच असल्याचे शिंदे यांनी सांगितले. त्यामुळे एप्रिल महिन्यापर्यंत तलाव पूर्णपणे कोरडा पडण्याची शक्यता असून पालकमंत्री विजय शिवतारे व संपर्कप्रमुख नितीन बानुगडे-पाटील यांनी त्वरित लक्ष घालावे, अशी मागणीही शिंदे यांनी केली आहे.