Fri, Jul 19, 2019 05:42होमपेज › Satara › विषय अजेंड्यावर येण्यापूर्वीच  फायरमनची ‘बकेट लिस्ट’

विषय अजेंड्यावर येण्यापूर्वीच  फायरमनची ‘बकेट लिस्ट’

Published On: Jun 28 2018 1:41AM | Last Updated: Jun 27 2018 11:14PMसातारा : प्रतिनिधी

फायरमन भरती, खुल्या जागा भाड्याने देणे, स्वच्छता कर्मचारी भरती हे विषय गुरुवारी होणार्‍या सर्वसाधारण सभेत गाजण्याची शक्यता आहे. अग्‍निशमन संचालनालयाची परवानगी न घेताच संबंधित उमेदवारांची परीक्षा घेऊन त्यांची अंतिम ‘लिस्ट’ बनवल्यावर हा विषय मंजुरीसाठी घेण्यात आल्याने आश्‍चर्य व्यक्‍त होत आहे. या विषयांची  सध्या जोरदार चर्चा नगरपालिकेत सुरू झाली आहे. 

सातारा नगरपालिकेची सर्वसाधारण सभा छत्रपती शिवाजी सभागृहात सकाळी 11 वाजता नगराध्यक्षा माधवी कदम यांच्या अध्यक्षतेखाली बोलवण्यात आली आहे. या सभेसमोर 11 विषय चर्चेसाठी घेण्यात आले आहेत. हे विषय मंजूर करून घेण्यासाठी सातारा विकास आघाडीच्या नगरसेवकांची सकाळी 11 वाजता नगराध्यक्षांच्या दालनात संबंधित अधिकार्‍यांसमवेत बैठक झाली. या बैठकीत अजेंड्यावरील विषयांची उजळणी झाली. त्यानंतर सायंकाळी 4 वाजता नगर विकास आघाडीनेही नगरसेवकांची विरोधी पक्षनेत्यांच्या दालनात बैठक घेऊन0 सभेच्या अजेंड्यावर चर्चा केली. संबंधित विषय, सूचना तसेच प्रस्तावातील त्रुटी या बाबी त्यांनी जाणून घेतल्या. उपसूचनेची तयारीही केली. दोन्ही आघाड्यांकडून संबंधित विषयांवर सविस्तर चर्चा होण्याची शक्यता आहे. मात्र, अजेंड्यावर काही विषय सत्‍ताधार्‍यांना अडचणीत आणणारेही असल्याचे दिसते. 

सातारा नगरपालिकेच्या शहरात मोठ्या प्रमाणावर खुल्या जागा आहेत. या जागांच्या मुदती संपून गेल्याने त्याचे पुन्हा लिलाव काढणारा विषय मंजुरीसाठी घेण्यात आला आहे. मात्र, भाड्याने दिलेल्या जागांचे  पूर्वीच्या आणि आताच्या दरांमध्ये मोठी तफावत आहे. नव्याने दर निश्‍चित करण्यासाठी त्रिसदस्यीय समितीच्या शिफारशीची आवश्यकता असते. त्यादृष्टीने विषय मंजुरीसाठी घेतला आहे की कसे, हे तपासणे आवश्यक आहे. जाहीर लिलाव काढूनही बर्‍याच जणांना त्याच त्या जागा कशा काय मिळतात हे कोडे सभागृहात उलगडेल का? असा सवाल केला जात आहे.

आरोग्य विभागातील 30 सफाई कर्मचार्‍यांची रिक्‍त पदे सेवा ज्येष्ठतेनुसार भरण्यासंदर्भात निर्णय घेणारा विषय अजेंड्यावर येण्याची ही  तिसरी वेळ आहे. गेल्या सभेमध्येच या विषयाला मंजुरी मिळाली. पण त्यानंतर कर्मचार्‍यांची ही पदे भरण्यासाठी  उपसमिती का  नेमली गेली?  या समितीची गरज का भासली? त्यासंदर्भात सभागृहात का चर्चा झाली नाही? असे अनेक प्रश्‍न आता उपस्थित झाले आहेत. 

कास तलावातून आलेल्या बंदिस्त पाईपलाईनमधून मार्गस्थ गावांना पाणी देण्यासंदर्भातही विषय चर्चेसाठी घेण्यात आला आहे. कास तलावातून पाणीपुरवठा होणार्‍या बर्‍याच गावांची पाणीपट्टी थकित आहे. दोन महिन्यांपूर्वी झालेल्या सर्वसाधारण सभेत यावर बराच उहापोह करण्यात आला होता. बेकायदा नळकनेक्शनचा विषयही  प्रचंड गाजला होता. कारवाईचे आश्‍वासन देण्यात आले होते पण त्याचे पुढे काय झाले? याचा जाब सभागृहात द्यावा लागणार आहे. 

सातारा नगरपालिकेमध्ये मंजूर आकृतीबंधानुसार सरळ सेवेने फायरमन पदाची रिक्‍त पदे भरली जाणार आहेत. मात्र, या जागा भरत असताना बर्‍याचजणांनी लडबडी केल्याची चर्चा आहे. पूर्वीच सर्वसाधारण सभेचा ठराव घेवून अग्निशमन संचालनालयाची परवानगी घेवून मगच  भरती प्रक्रिया राबवायला हवी होती, पण असे घडले नाही. 40 जणांची परीक्षा झाली. 33 जणांना परीक्षेला बोलावण्यात आले. त्यापैकी 6 जणांची निवड केली. सर्व काही अंतिम झाल्यानंतर हा विषय चर्चेला येणार असेल तर या कारभाराला काय म्हणावे? संबंधित पदांना अग्निशमन संचालनालयाची परवानगी असली तरी नगरपालिकेने राबवलेली प्रक्रिया नियमाला धरुन आहे का? यावर चर्चा होणे अपेक्षित आहे.  संंबंधित उमेदवारांची ‘बकेट लिस्ट’ सहा महिन्यांपूर्वीच तयार करण्यात आली असताना हा विषय इतक्या उशिरा अजेंड्यावर घ्यायला कोणत्या कारणांमुळे वेळ लागला? याची चर्चा होवू लागली आहे.