Wed, Jul 17, 2019 18:55होमपेज › Satara › महामार्ग बनलाय कचरा डेपो

महामार्ग बनलाय कचरा डेपो

Published On: Dec 18 2017 2:43AM | Last Updated: Dec 17 2017 10:20PM

बुकमार्क करा

कराड :  प्रतिनिधी

पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गालगत वारूंजी फाटा परिसरात सर्व्हिस रस्त्यालगतच मोठ्या प्रमाणावर कचरा टाकला जात आहे. यापूर्वीही याबाबत वारंवार आवाज उठवूनही महामार्ग देखभाल विभाग तसेच वारूंजी ग्रामपंचायत कोणतीच ठोस कार्यवाही करताना दिसत नाही. त्यामुळेच पाटण तिकाटणेतील परिस्थिती पाहता ‘महामार्ग आहे की कचरा डेपो?’ असा प्रश्‍न निर्माण होतो.

पुणे - बंगळूर महामार्गाचे चौपदरीकरण होऊन वारूंजी फाटा परिसरात उड्डाण पूल उभारण्यात आला. त्यामुळे पाटण अथवा चिपळूणकडे जाणार्‍या वाहनांसाठी नवीन कोयना पुलापासून काही अंतरावर सर्व्हिस रस्ता उपलब्ध करून देण्यात आला आहे. याच सर्व्हिस रस्त्यालगत काही वर्षापासून सातत्याने कचरा टाकला जातो. सध्यस्थितीत कचरा टाकण्याचे प्रमाण पाहता महामार्गालगतच कचरा डेपो करण्यात आला आहे की काय? असा प्रश्‍न निर्माण होतो.

वास्तविक, कचरा ज्या ठिकाणावर टाकला जातो, तेथून काही मीटरवर कोयना नदी आहे. तसेच याच परिसरात एक लहानसा ओढाही आहे. त्यामुळे कचरा थेट नदीतही मिसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. अगोदरच टेंभू योजना आणि कराड नगरपालिका यांच्यात नदीचे पाणी अडवल्यावरून अनेकदा परस्परविरोधी मते व्यक्त होत असतात. कराडकरांवर त्यामुळे अशुद्ध पाणी पुरवठ्याची टांगती तलवार नेहमीच कायम असते. अशा स्थितीत पाटण तिकाटणेतील कचरा डेपो कराडकरांच्या चिंतेत भर घालणाराच ठरत आहे. याशिवाय या ठिकाणीहून रहदारी करणार्‍या वाहन  चालकांना होणार त्रास वेगळाच आहे.