Tue, Mar 19, 2019 03:38होमपेज › Satara › आजपासून अवतरणार सर्वत्र ‘गण’राज्य

आजपासून अवतरणार सर्वत्र ‘गण’राज्य

Published On: Sep 13 2018 1:47AM | Last Updated: Sep 12 2018 11:14PMघरोघरी आता मंगलमय आरतींचा होणार गजर

 बाप्पांच्या आगमनामुळे वातावरण भक्तिमय

 वर्षानुवर्षे भक्तांच्या मस्तकावर कृपेचा हात  ठेवलेल्या बाप्पांसाठी सर्वत्र धामधूम सुरु होत आहे. 64 कलांचे आराध्य दैवत म्हणून प्रत्येक शुभकार्याप्रसंगी त्यांची आठवण ही ठरलेलीच असते. बाप्पांचा हा जागर सुरु होत असल्यामुळे वातावरण भरुन आले आहे. विघ्नहर्ता गणेश, सुखकर्ता गणेश, दु:खहारी गणेश म्हणून बाप्पांच्या गुणांचे गोडवे गाताना भक्तगण दिसत आहेत.  

सातारा : संजीव कदम

विघ्नहर्त्या बाप्पांचे आज आगमन होत असून अवघा आसमंत ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने दुमदुमून जाणार आहे. आता अकरा दिवस फक्त ‘गण’राज्यच अवतरणार असून घरोघरी ‘सुखकर्ता, दु:खहर्ता वार्ता विघ्नाची’ यासारख्या  आरती व  गणेश भक्तीचा महिमा सांगणार्‍या गीतांचा  जागर  सुरू राहणार आहे.  बाजारपेठांसह  अवघे जनजीवन बाप्पामय झाले असून उत्सव काळात केवळ गणेशभक्तीचाच महिमा चर्चिला जाणार आहे.

बाप्पांच्या भक्तीने आसमंत दुमदुमला... 

 कित्येक कोटी रुपयांची उलाढाल उत्सव काळात होत असल्याने त्याला वेगळाच दिमाख आहे. उत्सवाचा झगमगाट खूपच वाढला आहे. बाप्पांचे आगमन होणार असल्यामुळे गतीमान जीवनातील ताणतणावाकडे दुर्लक्ष करुन सर्वजण एका वेगळ्या भक्तीआनंदात तल्लीन होताना दिसत आहेत.

  गणेशोत्सवात देखाव्यांना खूप महत्व असते. बाप्पांची प्रतिष्ठापना झाल्यानंतर सार्वजनिक मंडळांच्या कार्यकर्त्यांना या देखाव्याचे  वेध लागतात. अखेरच्या चार-पाच दिवसात या कामांना गती येत असते. मात्र, आत्तापासूनच सार्वजनिक मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या उत्साहाला उधाण आले आहे. 


भक्तीचा महिमा कायमच

  लोकमान्य टिळकांनी लोकजागृतीसाठी घरगुती गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरुप दिले. त्याकाळी निदान गणेशोत्सवाच्या निमित्ताने तरी लोकांनी एकत्र यावे त्यांच्यात संवाद घडावा, असा हेतू होता. काळानुरुप उत्सव बदलू लागला असला तरी भक्तीचा महिमा काही कमी झालेला नाही.

उत्सव काळातील हे दिवस आता गणेशभक्तीचा महिमा आणखी समृद्ध करून जाणार आहे. बाप्पांच्या वास्तव्याने अवघं जनजीवन भक्तीरसात न्हाऊन जाणार आहे.  बाजारपेठेतही गणेशोत्सवाच्या साहित्यांनी झगमगाट निर्माण झाला आहे. बाप्पा विराजमान झाल्यानंतर महिला वर्गाला  गौराईंच्या आगमनाची आतुरता राहणार आहे. घरोघरी गणपतींच्या आरतींचा गजर व  भक्तीचा महिमा सुरु होत आहे. हा उत्सव म्हणजे भक्ती आणि आनंद सोहळाच. सर्वत्र सध्या गणेशाच्या महतीचा महिमा सांगणार्‍या गीतांचा सूर ऐकू येणार आहे. आरती व धार्मिक कार्यक्रमांमुळे सर्वत्र भक्तीचा महिमा गायला जाणार आहे.

यंदा अकरा दिवसांसाठी वास्तव्य...

महागाई, भ्रष्टाचार, अनाचार, दुराचाराच्या विघ्नांचे गांजलेपण तात्पुरते बाजूला ठेवून गुरूवारपासून अवघा आसमंत गणरायाच्या उत्साहासाठी सरसावला. बाप्पांच्या आगमनाकडे सार्‍यांच्याच नजरा लागल्या होत्या. गणेश चतुर्थीला आज अकरा दिवसांसाठी सार्वजनिक मंडळांचे  बाप्पा विराजमान होत असून त्यामुळे आता अमंगलाला विसरून मंगलमूर्तीच्या सेवेत अवघे जनजीवन तल्लीन होवून जाणार आहे.

 एरवी मंदिर आणि देवघरांपुरती असणारी गणेशभक्ती  आता सर्वव्यापी रूप धारण करणार आहे.  घरांपासून रस्त्यावरच्या मंडपापर्यंत सगळीकडेच गणपती बाप्पांचा जयघोष सुरू होत आहे. मंत्रोच्चारांनी वातावरण बहरून जाणार आहे.