Wed, Apr 24, 2019 11:31होमपेज › Satara › ओंड येथे भोंदू बुवाला अटक; रोकडसह सोने जप्त

ओंड येथे भोंदू बुवाला अटक; रोकडसह सोने जप्त

Published On: Sep 09 2018 1:58PM | Last Updated: Sep 09 2018 10:26PMकराड ः प्रतिनिधी 

ओंड (ता. कराड) येथे तालुका पोलिसांनी सातारा एलसीबी व ‘अंनिस’च्या मदतीने कारवाई करून भोंदू बुवा शंकर भीमराव परदेशी (वय 55, रा. ओंड, ता. कराड, मूळ रा. कर्नाटक) याला गजाआड केले. त्याच्याकडून सोन्याच्या अंगठ्या, रोख रक्‍कम तसेच देवीच्या नावावर लोकांकडून घेतलेले कपडे पोलिसांनी जप्त केले. या कारवाईमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.     

ओंड येथे गेल्या वीस वर्षांपासून या भोंदू बुवाने बाजार मांडला होता. काही दिवसांपूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातील चरण  येथील  सुनील विश्‍वास काळे यांनी आपल्याला कामधंदा मिळण्यासाठी व घरातील अडचणी दूर व्हाव्यात म्हणून भोंदू बाबा परदेशी याच्याकडे गार्‍हाणे मांडले. त्यावेळी भोंदू बाबाने देवाचं भागविण्यासाठी काळे यांच्याकडून दहा हजार रुपये घेतले. भोंदू बुवाला पैसे देण्यासाठी काळे यांनी लोकांकडून व्याजाने पैसे जमा केले होते. मात्र, भोंदू बाबाने केलेल्या पूजाविधीचा कोणताही फायदा होत नसल्याचे जाणवल्यामुळे सुनील काळे यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस) सातारा यांच्याकडे लेखी अर्ज देऊन तक्रार केली. त्यानंतर अंनिसच्या कार्यकर्त्यांनी याची खात्री करून घेतली व सातारा येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांना याबाबतची माहिती दिली. देव धर्माच्या नावाखाली लोकांना लाखो रुपयांचा गंडा घातल्याचे पोलिसांच्या लक्षात आले.

त्यानुसार रविवारी सकाळी डीवायएसपी नवनाथ ढवळे, स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि विकास जाधव यांच्या पथकासह अनिसच्या कार्यकर्त्यांनी ओंड येथे जाऊन भोंदु बाबाच्या घराजवळ सापळा लावला. भोंदू बुवाला ताब्यात घेऊन पोलिसांनी त्याच्या घराची झडती घेतली असता सुमारे लाखाहून अधिक रुपयांच्या सोन्याच्या अंगठ्या तसेच रोख रक्कम याशिवाय भक्‍तांकडून देवीच्या नावावर घेतलेले अंदाजे चार पोती कपडे पोलिसांना आढळले. यावेळी पोलिसांनी रोख रक्कम सोन्याचे दागिने व जादूटोण्याचे साहित्य जप्त केले. भोंदू बुवा एका व्यक्‍तीकडून अंदाजे 20 ते 25 हजार रुपये घेत असल्याचे अंनिसच्या कार्यकर्त्यांनी सांगितले. प्रत्येक अमावस्या व पोर्णिमेला तो आपला दरबार भरवित होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये मोठे रॅकेट असण्याची शक्यता पोलिस व अंनिसच्या कार्यकर्त्यांनी वर्तवली आहे.

लोकांची कारणे अनेक, भोंदू बाबाचा उतारा एक.. 

दैवी चमत्काराचा दावा करून त्याद्वारे घरात रेणुका देवीचा दरबार भरवून भोंदू बाबा शंकर परदेशी लोकांची फसवणूक करीत होता. नोकरी, कामधंदा, घरगुती अडचण दूर करणे, लग्न जमविणे, जमिनीचा वाद मिटविणे आदी कारणांनी आलेल्या लोकांना भोंदू बाबाने लाखों रुपयांचा गंडा घातला आहे. त्याच्याकडे येणार्‍या लोकांची वेेेगवेगळी कारणे असली तरी दोन कोंबडे व एक बोकड असा एकच उपाय सांगून तो लोकांची फसवणूक करीत होता. रविवारीही काही लोक भोंदु बाबाच्या दरबारात आले होते.