Mon, May 25, 2020 22:44होमपेज › Satara › मद्यपींकडून थर्टी फर्स्टचेही ठरु लागले बेत

चार भिंतीवरील ‘ओपन बार’ सुरुच

Published On: Dec 31 2017 1:28AM | Last Updated: Dec 30 2017 10:47PM

बुकमार्क करा
सातारा : सुशांत पाटील 

सातार्‍याच्या ऐतिहासिक चार भिंतीवर टवाळखोर मद्यपींनी पुन्हा आपले बस्तान मांडले आहे. त्यामुळे पर्यटकांना दिवसाढवळ्या मद्यपींची  शेरेबाजी ऐकावी लागत आहे.  सुरक्षा रक्षकाकडून प्रवेश शुल्क आकारुनही येणार्‍या पर्यटकांना चार भिंतीवर मनमोकळेपणाने फिरता येत नाही. त्यामुळे पर्यटक व नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. दरम्यान, याच चार भिंती परिसरात थर्टी फस्टच्या जंगी तयारीचे प्लॅनही ठरु लागले आहेत.  थर्टी फस्टच्या पार्श्‍वभूमीवर चार भिंतीवर घडणारे गैरप्रकार प्रशासनाने तत्काळ थांबवण्याची मागणी स्थानिक नागरिक  व पर्यटकांतून होत आहे.

मराठ्यांची राजधानी असलेल्या ऐतिहासिक सातार्‍याचा वैभवशाली ठेवा म्हणजे  चार भिंत.  इ.स 1830 च्या सुमारास सातारचे छत्रपती प्रतापसिंह महाराजांनी टेकडीवर ‘चार भिंती’ म्हणून ओळखली जाणारी इमारत बांधली.  या इमारतीवरुन शत्रूवर नजर ठेवली जायची. त्यामुळेच या वास्तूला ‘नजर बंगला’ म्हणून ओळखले जाऊ लागले. मात्र, सध्या ही ऐतिहासिक भिंत विविध कारणामुळेच चर्चेली जाऊ लागली आहे. त्यामुळे ही ऐतिहासिक वास्तू मद्यपी अन् प्रेमी युगुलांचा अड्डाच बनत चालला आहे.

चार भिंतीच्या टेकडीवर जाताना दारुच्या बाटल्यांचा  पडलेला खचच चार भिंतीवर असलेल्या पुढील अवस्थेचं दर्शन घडवतो. पुढे पुढे प्लास्टिकच्या पिशव्या, पाण्याच्या बाटल्या, बर्थडे पार्टीसाठी उडवलेल्या फटाकड्यांच्या माळा असे हळूहळू मद्यपींनी केलेल्या कारनाम्याचे दर्शन घडविते.  

कित्येकजण चार भिंतीवरच आपले  बर्थडे व दारुच्या पार्ट्या करत असल्यामुळे तेथे येणार्‍या पर्यटकांचे घाणीच्या साम्राज्यानेच स्वागत होते.चार भिंतीवर पाऊल ठेवताच त्या ठिकाणी असलेला मद्यपींचे टोळके प्रवेशव्दारावर बसलेले असते. एकटा -दुकटा पर्यटक असेल तर त्याच्यावर  शेरेबाजी किंवा दमदाटी केली जाते. सामान्य पर्यटकांना तेथे लुटण्याचेही प्रकार यापूर्वी घडले आहेत. त्यामुळे तेथे फिरकनेही पर्यटकांनी सोडून दिले आहे. 

दारुच्या पार्ट्या झाल्यानंतर तेथेच बाटल्या टाकल्या जातात. परिसरात सर्वत्र काचांचे व प्लास्टिकच्या पिशव्यांचे थर साचलेले आहेत. दारुच्या नशेत त्या ठिकाणी हाणामारीचे प्रकारही घडत आहेत. संध्याकाळच्या सुमारास चार भिंतीवर  अवैध प्रकारचे धंदेच चालत असल्याचे बोलले जाते. तेथील इतिहासाच्या साक्ष देणार्‍या पाट्या मुजत चालल्या आहेत. चार भिंतीच्या प्रत्येक कोपर्‍याकोपर्‍यात प्रेमी युगुलांच्या प्रेम प्रकट करणार्‍या अक्षरांचा भरणा झालाय. त्यामुळे ऐतिहासिक  असलेल्या या वास्तूचे विद्रुपीकरण झाले आहे. 

प्रेमी युगुलांचे कोपर्‍या कोपर्‍यात चाळे सुरु असून तेथे येणार्‍या पर्यटकांनाही हटकण्यास ते घाबरत नाहीत. भिंतीवर असलेल्या ऐतिहासिक पाण्याच्या टाकीची कचराकुंडी केली असून त्यात  विविध वस्तू व दारुच्या बाटल्या टाकल्यामुळे तेथे घाणीचे साम्राज्य पसरले आहे. 

सुरक्षा नाही मग प्रवेश शुल्क कशाला ?

चार भिंतीवर मद्यपींच्या दहशतीबाबत दै.‘पुढारी’ ने वेळोवेळी आवाज उठवला होता. त्यामुळेच तेथे युवा स्वयंरोजगार संस्थेने सुरक्षारक्षक नेमले होते. मात्र, काही दिवसानंतरच त्यांनी भिंतीवरील सुरक्षा उठवली. आता तेथे एक खाजगी सुरक्षारक्षक कार्यरत आहे. तो पर्यटकांकडून पाच रुपये शुल्कही आकारात आहे. पण तरीही त्याच्यासमोर चार भिंतीवर मद्यपींच्या पार्ट्या रंगतात. जर चार भिंतीवर सुरक्षाच मिळत नसेल प्रवेश शुल्क कशासाठी? असा सवाल  नागरिकांतून केला जात आहे.