Mon, Aug 19, 2019 05:16होमपेज › Satara › संयुक्‍त वन व्यवस्थापन समित्या केवळ कागदावरच

संयुक्‍त वन व्यवस्थापन समित्या केवळ कागदावरच

Published On: Feb 15 2018 1:58AM | Last Updated: Feb 14 2018 10:02PMसातारा : प्रवीण शिंगटे 

आगीपासून जंगलांचे संरक्षण करण्याची जबाबदारी संयुक्त वन व्यवस्थापन कार्यक्रमाअंतर्गत सातारा जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात गठीत केलेल्या संयुक्त वनव्यवस्थापन समित्यांवर सोपविण्यात आली आहे. मात्र, सध्य स्थितीत 825  हून अधिक समित्या जिल्ह्यात कार्यरत असल्या तरी  त्यातील किती समित्या जंगलाचे संरक्षण करतात? असा प्रश्‍न उपस्थित होऊ लागला असून या समित्या केवळ कागदावरच अस्तित्वात असल्याचे दिसून येत आहे.

सातारा  जिल्ह्यात सातारा,  कराड, पाटण, वाई, महाबळेश्‍वर, जावली, खंडाळा, कोरेगाव, फलटण, खटाव, माण अशा 11 तालुक्यात  सुमारे 1 लाख 18 हजार  174.62 हेक्टर वनक्षेत्र आहे. या वनालगत असणार्‍या गावामध्ये वनविभागाच्यावतीने सातारा 94, महाबळेश्‍वर 93, कराड 76, ढेबेवाडी 51, पाटण 120, फलटण 75, दहिवडी 70, वडूज 61, कोरेगाव 50, मेढा 75, वाई 61, खंडाळा 50 अशा सुमारे 825 संयुक्त वनव्यवस्थापन समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. या समित्यामार्फत वनाचे संरक्षण केले जाते. ज्या वनसंरक्षण समित्यांनी वनालगत चांगले काम केले आहे, अशा वनसंरक्षण समित्यांना वन विभागाच्या संत तुकाराम वनग्राम योजना या पुरस्काराने गौरविण्यात येते,  मात्र जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणच्या वनसंरक्षण समित्या  अकार्यक्षम  ठरत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. सध्य स्थितीत सुमारे 60 ते  70 टक्केच संयुक्त वनव्यवस्थापन समित्या कार्यरत आहेत.  वन विभाग मात्र या वन समित्यांच्या सहभागांमुळे वन वणव्यावर नियंत्रण ठेवत असल्याचा दावा करताना दिसत आहे. 

वनविभागाच्या हद्दीत आगीच्या वणव्यात दरवर्षी शेकडो हेक्टरमधील जंगल भक्ष्यस्थानी पडते. राष्ट्रीय संपत्तीचा मोठ्या प्रमाणावर नाश होतो. जंगलातील अवैध वृक्षतोड प्रकरणे उघड होवू  नये म्हणूनही आग लावले जाण्याचेही प्रकार घडतात.  जंगलात लागणार्‍या आगीत होरपळून मोठ्या प्राण्याबरोबर सरपटणारे प्राणी बळी पडतात, मात्र ही आग वेगाने वाहणार्‍या वार्‍याने जंगलातील झाडांना कवटाळत असते.  झाडावरील पक्षांची  घरटी आगीच्या भक्ष्यस्थानी पडतात. त्यामुळे नैसर्गिक व कृत्रिम असे सर्वच प्रकारचे वणवे टाळण्याचे आवाहन वनविभागासमोर आहे.

वन वणव्याची समस्या  नियंत्रणात रहावी म्हणून वन विभाग हंगामाच्या प्रारंभीच आग प्रतिबंधक उपायांवर भर देत असतो. विशिष्ट वन क्षेत्राचा भाग तयार करून त्याभोवती जाळ प्रतिबंधक रेषा (फायर लाईन) बनविली जाते.  जंगलात  ठराविक अंतर ठेवून  रिकाम्या राहणार्‍या  या रेषेच्या जागेत पाला पाचोळा राहणार नाही याची दक्षता घेतली जाते.  यामुळे एका भागात वणवा पेटला तरी तो दुसर्‍या परिसरात पोहोचत नाही. यामुळे कमीत कमी हानी होण्यासाठी प्रयत्न केला जातो. जंगलाच्या आसपास वास्तव्यास असणार्‍या नागरिकांमध्ये जनजागृती केली जाते. वन संरक्षण समित्यांच्या माध्यमातून केले जाणारे हे काम प्रत्यक्षात होते का नाही? याबाबत पर्यावरण व निसर्गपे्रमींमधून साशंकता व्यक्त केली जात आहे.
(क्रमश:)