Sun, May 19, 2019 22:15होमपेज › Satara › शिकारी जोमात अन् अधिकारी कोमात

शिकारी जोमात अन् अधिकारी कोमात

Published On: Mar 17 2018 1:13AM | Last Updated: Mar 16 2018 8:22PMशाहूपुरी : वार्ताहर

सातारा शहराच्या चहूबाजूने डोंगराळ प्रदेश आहे. या भागात अनेक जंगली श्‍वापदे आढळतात. परंतु, गेल्या काही महिन्यांपासून काही भागामध्ये रानडुकरांसह छोट्या प्राण्यांच्या शिकारीचे प्रमाण वाढले आहे. याकडे वन विभागाचे दुर्लक्ष झाल्याने वन्य प्राण्यांचे जीवन धोक्यात आले आहे. आश्‍चर्याची बाब म्हणजे वन्य प्राण्यांच्या शिकारी रोखण्यासाठी जिल्ह्यासाठी एकच फिरते पथक कार्यरत आहे. त्यामुळे हे पथक कोठे कोठे फिरणार? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. 

सातारा शहराला चहूबाजूने डोेंगरांनी वेढले आहे. अजिंक्यतारा किल्‍ला, यवतेश्‍वर डोंगर, जरंडेश्‍वर या भागामध्ये वन्य प्राण्यांचे वास्तव्य आहे. येथील जंगलांमध्ये बिबट्या, गवा, तरस, लांडगे, रानडुक्कर, भेकर ससे असे अनेक वन्यजीव प्राणी आढळून आले आहेत. वनविभागा मार्फत दरवर्षी व्याघ्र गणना राबवून बिबटे व अन्य हिंस्र प्राण्यांचे प्रमाण किती वाढले याची माहिती काढण्यात येते. 4 वर्षातून होत असलेल्या या प्राणी गणनेत नेमकी संख्या कितीने वाढली याची माहिती मिळत नसल्याचे वन विभागाच्या अधिकार्‍यांकडून सांगण्यात येते. 

त्यामुळे या कालावधीत किती प्राण्यांची शिकार झाली याची माहितीच वन विभागाकडे उपलब्ध नाही. त्यातच पूर्ण जिल्ह्यासाठी शिकारी कमी होण्यासाठी अवघे एकच पथक असल्याने शिकारींचे प्रमाण कमी होत नसल्याचे दिसून आले आहे. ज्या प्रमाणे शिकारींमुळे वन्य प्राण्यांचे जीव धोक्यात आले आहे. त्याचप्रमाणे वाढत्या वणव्यांमुळेही हे प्राणी होरपळून मरत आहेत. वणवे आटोक्यात आणण्यासाठी वन विभाग कमी पडत असल्याने वन्य प्राण्यांचे हकनाक जीव जात आहेत. 

ज्याप्रमाणे वन संपदा जितकी महत्वाची तितकेच वन्य प्राणीही महत्वाचे आहेत. असे असूनही वन विभागाकडून कारवाई होण्यास टाळाटाळ होत आहे. अनेकदा वन विभागाचे अधिकारी शिकार केल्याप्रकरणी नागरिकांना पकडतात. मात्र, शिकार होऊच नये यासाठी कोणतेही प्रयत्न होताना दिसत नाहीत. ग्रामीण भागात दर 15 दिवसाला रान डुकरांच्या मांसाची विक्री केली जाते. याची माहिती वन विभागाला नसावी हे न समजण्यापलीकडचे कोडे आहे. 

अधिकारी व्याघ्र गणनेपुरतेच उरले काय?

वन्य प्राण्यांची शिकार आणि वणवे रोखण्यात वन विभाग अपयशी ठरत असल्याने या विभागातील अधिकारी फक्‍त व्याघ्र गणनेपुरते मर्यादित राहिले काय? असा  सवाल उपस्थित केला जात आहे. शहराच्या लगतच्या भागातच शिकारी होत असताना भरारी पथक नेमके काय करते तसेच मुद्दाम शिकार्‍यांकडे दुर्लक्ष केले जाते काय? असा प्रश्‍नही नागरिकांमधून  उपस्थित केला जात आहे.

Tags : Satara, Satara News, Forest, Forest Determent, Animal, Wild Animal Anti Hunt Squad,