Mon, Aug 19, 2019 09:28होमपेज › Satara › ज्येष्ठ लावणी सम्राज्ञी पद्मश्री यमुनाबाई वाईकर यांचे निधन

ज्येष्ठ लावणी सम्राज्ञी पद्मश्री यमुनाबाई वाईकर यांचे निधन

Published On: May 15 2018 3:15PM | Last Updated: May 15 2018 3:20PMवाई  : प्रतिनिधी

आपल्या अदाकारीने व आवाजाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविणार्‍या वाईतील लावणी साम्राज्ञी पद्मश्री यमुनाबाई वाईकर यांचे अल्पशा आजाराने मंगळवारी दुपारी 12.30 वा. निधन झाले. त्या 99 वर्षांच्या होत्या. 

बुधवारी (दि. 16) दु. 12 वाजता सोनगीरवाडी स्मशानभूमीलगत कोल्हाटी समाजाच्या जागेत शासकीय इतमामात त्यांचा दफनविधी होणार आहे. सकाळी 10 वाजता त्यांच्या घरापासून अंत्ययात्रा काढण्यात येणार आहे. यमुनाबाई वाईकर यांनी अविरत कलेची साधना केली. 

त्या शेवटपर्यंत सुस्पष्ट व मधुर आवाजात लावण्या म्हणत होत्या. बैठकीच्या लावणीला त्यांनी वैभव प्राप्त करून दिले. श्रीमती यमुनाबाई विक्रम जावळे या यमुनाबाई वाईकर या नावानेच ओळखल्या जायच्या. जन्म 1919 मध्ये सातारा जिल्हयातील नुने -कळंबे या गावी कोल्हाटी (डोंबारी) समाजात झाला. कुटूंबामध्ये आई, वडील, भाऊ व 4 बहिणी असा त्यांचा परिवार होता. अठराविश्‍वे दारिद्रय असणार्‍या 

समाजाच्या वाट्याची दुःखे त्यांनी भोगली. उदरनिर्वाहासाठी खेडया पाडयातून डोंबार्‍यांचे खेळ, कसरतीची कामे केली. सुगीच्या दिवसात कोकणातील खेडयांमध्ये व पावसाळयात देशावर असा भटकंतीचा प्रवास असे. पोटासाठी आई तुणतुण्यावर गाणी म्हणे व हातावर कपाळावर गोंदण टोचण करीत भिक्षा मागे. बालपणापासूनच आई गिताबाई यांच्याकडून गाण्याचे, लावणी गायन व अदाकारीचे धडे त्यांनी गिरवले.

शहरातील थियटरमधून त्यांचे कार्यक्रम होत. मधुकर नेराळे यांनी त्यांचे कार्यक्रम संपूर्ण भारतात प्रदर्शीत केले. 1964 साली समाज कल्याण मंत्री पाडवी यांच्या माध्यमातून कायम स्वरुपाची राहण्यास जागा व घर बांधून दि बॅकवर्ड क्लास को. ऑप हौसिंग सोसायटी निर्माण केली. समाजातील मुलांसाठी शिक्षण निधी उभा केला. आर्थिक सुबत्ता आल्याने लता लोकनाटय तमाशा मंडळ या नावाने लोकनाटयाचा तंबूचा फड त्यांनी सुरू केला. दोन ट्रक, दोन पाखी तंबू व 60 ते 65 कलाकारांचा संच संपूर्ण महाराष्ट्रात सतत 12 वर्षे तमाशाच्या माध्यमातून लोकरंजन, लोकजागृती करत होत्या.

1972-73 साली लोकनाटय बंद करावे लागले. आर्थिक स्थिती पुन्हा बिकट व उदरनिर्वाहाचा प्रश्‍न निर्माण झाला. त्यांनी पुन्हा यमुना-हिरा-तारा संगित पार्टी नावारुपाला आणली. 

4 एप्रिल 2012 रोजी त्यांना राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. 1977-78 साली शासनाने त्यांना महाराष्ट्र राज्य पुरस्कार, 1984 व 86 च्या दरम्यान दिल्‍ली, कलकत्ता, भोपाळ, रायपूर, बिलासपूर या शहरातून व आकाशवाणी- दूरदर्शन वरून कार्यक्रम, कॅलिफोर्निया विद्यापिठातील ख्रिस्तीन रॉव यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली तमाशा व लावणी संगीत विषय घेऊन पीएचडी मिळवली.

1989 मध्ये जागतिक मराठी परिषदेने गौरव प्रतिक पुरस्कार श्रीमती यमुनाबाईंना देवून गौरव केला. महाराष्ट्र गौरव पुरस्कार 1990, सांगली नगर परिषद पुरस्कार 1991, वाई नगर परिषद पुरस्कार 1992, राष्ट्रपती डॉ. शंकर दयाळ शर्मा यांच्या हस्ते ‘संगीत नाटक अकादमी’ पुरस्कार 1995, शाहिर पठ्ठे बापूराव पुरस्कार 1995, अहिल्यादेवी होळकर पुरस्कार 1999-2000 असे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले होते.

अखिल महाराष्ट्र कोल्हाटी समाज परिषदेची त्यांनी निर्मिती केली. 1995 मध्ये कोल्हाटी समाज धर्मशाळा बांधली. 1997 मध्ये पंडित बिरजू महाराज यांच्यासमवेत पुणे येथे संगीत लावणी व कथ्थक जुगलबंधी कार्यक्रम सादर करून लावणीचे नवीन पर्व सुरू केले. शेवटपर्यंत यमुनाबाईंची बुध्दी तल्‍लख होती.