Tue, Jul 23, 2019 02:12होमपेज › Satara › फायरिंग करणार्‍या युवकाला अटक

फायरिंग करणार्‍या युवकाला अटक

Published On: Jun 03 2018 1:20AM | Last Updated: Jun 02 2018 11:14PMसातारा : प्रतिनिधी

शहरातील बुधवार नाका परिसरात फायरिंग करणार्‍या ऋषभ राजेंद्र जाधव याला शनिवारी पहाटे पोलिसांनी जेरबंद केले. स्थानिक गुन्हे अन्वेषनच्या टीमने शनिवारी पहाटे ऋषभला कोल्हापूर शहरातील लक्ष्मीपुरी परिसरातून अटक केली असल्याची माहिती एलसीबीचे पोनि पद्माकर घनवट यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, या घटनेतील अन्य दोघांच्या अटकेसाठी पोलिसांचा तपास सुरू असल्याचे घनवट यांनी सांगितले. 

घनवट म्हणाले, गुरुवारी घटना घडल्यानंतर     ऋषभ जाधव व त्याचे साथीदार निहार उर्फ मन्या सातव व सूरज कदम यांच्या शोधासाठी तीन पथके रवाना करण्यात आली होती. ऋषभ याचे नातेवाईक हे कोल्हापूरला असून तो नातेवाईकांकडे गेला असल्याची शक्यता असल्याने पोलिस उपनिरीक्षक प्रसन्न जर्‍हाड व पोलिस कर्मचार्‍यांचे एक पथक कोल्हापूरला रवाना झाले. लक्ष्मीनगर परिसरात ऋषभच्या नातेवाईकांचे घर असल्याने पोलिसांनी या ठिकाणी सापळा रचला. शनिवारी पहाटे तो या ठिकाणी आल्यानंतर पोलिसांनी ताब्यात घेतला. 

ताब्यात घेतल्यानंतर अधिक चौकशी केल्यानंतर त्याने पूर्ववैमनस्याचा घटनाक्रमच सांगितला. मी व अतिक  दोघे सातार्‍यातील एका कॉलेजमध्ये 12 वीला होतो. तेव्हा अतिक याचे एका मुलीवर एकतर्फी प्रेम होते. तीच मुलगी माझ्याकडे वारंवार कामानिमित्त येऊन बोलत होती. यावरून अतिक व माझ्यात वादावादी झाली होती. ती मुलगी फक्त माझी एक मैत्रिण असून आमच्यात तसे काही नाही असे मी अतिकला सांगितले होते. कॉलेज संपल्यानंतर पुन्हा एकदा तीच मुलगी अतिकला माझ्यासोबत बोलताना दिसली होती. माझा मोनार्क हॉटेलजवळ चहाचा गाडा होता. त्यावेळी अतिक याने तेथे येऊन मला मारहाण केली होती. याच रागातून मीही अतिकला दोन वेळा मारहाण केली होती. अतिककडून सतत टॉर्चर होत असल्याने आपण गोळीबार केला असल्याची कबुली ऋषभ याने दिली असल्याने घनवट यांनी सांगितले. 

ऋषभने ज्या पिस्तुलमधून गोळीबार केला याबाबत विचारले असता हे पिस्तुल त्याच्याकडे 6-7 महिन्यांपासून बाळगत असल्याचे सांगितले. अतिक व ऋषभ यांच्यामध्ये मारामारी झाल्याप्रकरणी सातारा शहर व शाहुपूरी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. तर ऋषभ याच्यावर तलवार बाळगल्याप्रकरणीही गुन्हा दाखल आहे. 
मुख्य सूत्रधाराला अटक केल्यानंतर पोलिसांनी आता त्याचे साथीदार निहार व सूरज यांना अटक करण्यासाठी तपासावर लक्ष केंद्रीत केले आहे. गोळीबारच्या घटनेमध्ये हे दोघे सहकारी असून त्यांनाही लवकरच अटक करण्यात येणार असल्याचे घनवट यांनी सांगितले. 

या कारवाईत पोलिस उपनिरीक्षक प्रसन्न जर्‍हाड, सहाय्यक पोलिस फौजदार पानसांडे, तानाजी माने, आनंदराव भोईटे, विजय कांबळे, शेरद बेबले, नितीन गोगावले, संतोष पवार, प्रवीण फडतरे, हवालदार निलेश काटकर, मारूती लाटणे, संजय जाधव, विजय सावंत, गणेश कचरे  यांनी सहभाग घेतला.