Sat, Aug 24, 2019 21:12होमपेज › Satara › वाईमधील ‘ये आग कब बुझेगी..?’

वाईमधील ‘ये आग कब बुझेगी..?’

Published On: May 28 2018 1:33AM | Last Updated: May 28 2018 12:07AMवाई : यशवंत कारंडे

वाई शहरात मुख्य वाई नगरपालिका जळीत प्रकरणापासून वाईत आगी लागण्याचे प्रमाण वाढले आहे. विविध दुकाने, शोरुमना आगी लागत असून त्या खरेच शॉर्टसर्किटने लागताहेत का? यावर  वाई परिसरात चर्चा होत आहेत. दरम्यान सातत्याने आगी लागण्याने ‘ये आग कब बुझेगी’ असे म्हणण्याची वेळ सामान्यांवर आली आहे.

वाईत अद्याप जुन्या पद्धतीची घरे व दुकाने असल्याने यातील जुनेच वायरिंग धोका देत आहे. इनर्व्हटरची योग्य देखभाल होत नसल्याने  बॅटरीमुळेही जळीत प्रकरण घडत आहे. वाई बाजारपेठेत महिनाभरात दुसर्‍यांदा दुकान पेटण्याची घटना घडली आहे. मागील 20 दिवसांपूर्वी धर्मपुरीपेठ येथे एका इलेक्ट्रीक साहित्य दुकानाला आग लागून लाखोंचे साहित्य जळाले. रविवारी पहाटे तीन वाजता प्रसिद्ध नवजीवन या जुन्या मिसळपावसाठी प्रसिद्ध असणार्‍या हॉटेलला आग लागली तर त्याच्या शेजारचेही आईस्क्रीम पार्लर जळाले.

यापूर्वी वाईत प्रसिद्ध मुळे क्लॉथ एम्पोरियम हे कापड दुकान जळून खाक झाल्याने वाईकरांनी हळहळ व्यक्त केली. सायकल दुकान तसेच वाईतील शैक्षणिक संकुल दिशा अ‍ॅकॅडमीला आग लागल्याने वाईकर एकवटले होते. आगीच्या प्रत्येकक्षणी वाईकर नेहमीच जीवाची पर्वा न करता एकवटले आहेत. खाजगी पाणी टँकरने वाई, पाचगणी, महाबळेश्‍वर किसनवीर कारखाना, सातारा पालिकेचे टँकर कायम अशा घटनांवेळी धावून आले आहेत.

वाईत आग लागल्यानंतर प्रत्येकवेळी शंका उपस्थित केली जात आहे. आग लागली, लावली, कशामुळे लागली हे नेहमीचे अनुरुत्तीत प्रश्‍न आहेत.  आगीच्या 7 - 8 घटनांनंतर वाई पालिकेचा अग्नीशामक बंब आला. या आगीवरच वाईचे राजकारण निवडणुकीत चालले. विरोधकांसाठी वाईतील आगीच आत्तापर्यंत मोठे भांडवल  ठरल्या.

वाई औद्योगिक वसाहतीत भारत पेट्रोलियम या गॅस कंपनीशेजारीच कचरा डेपो आहे. हा कचरा डेपो वर्षभर अधूनमधून पेटत असतो. त्या शेजारीच गॅसच्या मोठ्या टाक्या भरलेल्या असतात तर बाहेर 20 ते 25 गॅस टँकर भरलेल्या अवस्थेत असतात. त्यामुुळे ही आग एखाद्या दिवशी वाई शहराच्या जीवावर बेतण्याची शक्यताच निर्माण झाली आहे.

वाई पेन्शनरांचे गाव असले तरी येथे सध्या सेकंड होम म्हणून अनेकांनी फ्लॅट घेतले आहेत. जुने वाडे नामशेष झाले असले तरी शेती मोठ्या प्रमाणात आहे. शेतामध्ये ऊस अथवा अन्य पिक पेटण्याचे व पेटवण्याचे प्रमाणही वाईत वाढले आहे. औद्योगिक वसाहतीमुळे रोजगार सोबत क्राईमही वाढला आहे. वाईत जुनी लाकूड फाट्याची सुस्थितीतील घरे व दुकाने आहेत. मात्र वायरिंग जुनेच असल्याने शॉर्टसर्कीटचे प्रमाण वाढले आहे. वास्तविक वाई औद्योगिक वसाहतीतही अग्नीशामक बंब असणे गरजेचे आहे. 

गरवारे वॉल रोप्स, सुनंदा प्लास्टीक कं. या केमिकलच्या दोन कंपन्या जळून सात - आठ जणांना जीव गमवावे लागले आहेत. त्यामुळे वाई हे जळीत प्रकरणांचे माहेरघरच आहे का? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.