Thu, Jun 20, 2019 01:04होमपेज › Satara › अतीत, पाडळी भागातील शेतीची वीज बंद

अतीत, पाडळी भागातील शेतीची वीज बंद

Published On: Mar 20 2018 1:50AM | Last Updated: Mar 19 2018 11:10PMवेणेगाव : वार्ताहर 

अतीत, पाडळी या वीज वितरण कार्यालयाकडून कृषी पंपाच्या थकीत वीज बिलाचे कारण पुढे करत वेणेगावसह परिसरातील डीपींचा वीज पुरवठा बंद करण्यात आला. त्यामुळे शेतकर्‍यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान अशीच कारवाई नागठाणे येथे दि. 22 मार्चपासून करण्यात येणार असल्याचे समजते. 

सातारा तालुक्यातील वीज वितरण कंपनीला मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळणारे वीज वितरण कार्यालय अतीत असताना गेल्या वर्षात चार प्रभारी अभियंता देण्यात आले; मात्र कायमस्वरूपी अभियंता काही मिळाला नाही. अपुर्‍या वायरमन संख्येवर चालणार्‍या कारभारावर कसेबसे समाधानी असणार्‍या या भागातील बळीराजापुढे आता नवे संकट उभे राहिले आहे. सोमवारपासून अतीत व पाडळी फिडरवरून वीज पुरवठा असणार्‍या काही डीपी थकीत बिलाचे कारण पुढे करत बंद केल्याने शेतकरी वर्गामध्ये कमालीची नाराजी निर्माण झाली आहे. मात्र जे ग्राहक वेळेवर बील भरत आहेत ते ग्राहक या कारवाईत विनाकारण भरडून जाणार आहेत. याबाबत नागठाणे, अतीत, पाडळी परिसरातील लोक प्रतिनिधींसह राजकीय नेतेमंडळींनी चुप्पी ठेवली असून वेळेवर बील अदा करणार्‍या ग्राहकांना याचा फटका बसणार आहे. 

याबाबत अतीत वीज वितरण कार्यालयाचे अभियंता अमोल बिराजदार व नागठाणे कार्यालयाचे अजित ढगाले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अतीत फिडरची  कृषी पंपाची एकूण थकबाकी 6 कोटी 89 लाख रुपये असून पाडळी उपकेंद्राची 3 कोटी 22 लाख रूपये आहे. तर नागठाणे सबस्टेशनची 4 कोटी 4 लाख रुपये इतकी थकबाकी असल्याचे सांगितले. थकीत बिलामुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगून कोणत्याही परिस्थितीत वेळेवर वीज बिल भरणार्‍या ग्राहकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेतली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. 

दरम्यान, याबाबत बोलताना काशीळ येथील सामाजिक कार्यकर्ते भरत माने म्हणाले, वीज वितरण कंपनीचा निर्णय चुकीचा असून कोणतीही पूर्वसूचना न देता  डीपी बंद करून सरसकट वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्याचा निर्णय हा त्रासदायक आहे.  जे ग्राहक थकीत आहेत त्यांच्याविरुद्ध कायदेशीर बाबींतून धोरणात्मक निर्णय घ्यावा; परंतु  वेळेवर वीज बिल भरणार्‍या ग्राहकांचे नुकसान करू नये, असे ते म्हणाले. 

 

Tags : satara, Atit, Padali news, farming electricity, Mahavitaran,