Thu, Jan 17, 2019 03:52होमपेज › Satara › सातारा : ऊस बिलासाठी 'अथणी - रयत'समोर बळीराजाची निदर्शने

सातारा : ऊस बिलासाठी 'अथणी - रयत'समोर बळीराजाची निदर्शने

Published On: Jul 07 2018 1:00PM | Last Updated: Jul 07 2018 1:00PMकराड : प्रतिनिधी 

शेवाळेवाडी, म्हासोली (ता. कराड, जि. सातारा) येथील रयत - अथणी कारखान्यासमोर शनिवारी बळीराजा शेतकरी संघटनेकडून जोरदार निदर्शने करण्यात आली. रयत - अथणी कारखान्यासह प्रशासनाला आठवडाभरापूर्वी संघटनेकडून ऊस बिलाबाबत निवेदन देण्यात आले होते. त्यानंतरही शेतकऱ्यांची थकीत ऊस बिले न दिल्याने ही निदर्शने करण्यात आली.

बळीराजा शेतकरी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील, सातारा जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला, उत्तमराव खबाले, अविनाश फुके, सुनिल कोळी, सागर कांबळे यांच्यासह बळीराजा शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते. 

बळीराजा शेतकरी संघटनेने निदर्शने सुरू केल्यावर कारखाना प्रशासन प्रति टन दोन हजार रूपयाप्रमाणे शेतकऱ्यांचे पैसे बँक खात्यावर जमा करण्यासाठी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेंत गेल्याचे पंजाबराव पाटील यांनी सांगितले आहे. प्रतिटन अडीच हजार रूपयांची मागणी असून आजवर कारखान्याने शेतकऱ्यांना एक रूपयाही बील दिलेले नाही. कारखान्याचे चेअरमन यांनी मात्र स्वत:चे बील यापूर्वीच घेतले आहे. त्यामुळेच त्यांचा निषेध नोंदवत पंबाजराव पाटील यांनी आम्हाला शेतकऱ्यांचे पैसे जमा झाल्याची खात्री होत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचे सांगितले आहे. त्याचबरोबर दोन हजार दिल्यानंतर उर्वरित पाचशे रूपयांबाबत लेखी हमीपत्र घेणार असल्याचेही संकेत पाटील यांनी दिले आहेत.