Tue, Apr 23, 2019 07:35होमपेज › Satara › कराड : शेतकऱ्यांकडून सरकारचे प्रथम वर्षश्राद्ध (Video)

कराड : शेतकऱ्यांकडून सरकारचे प्रथम वर्षश्राद्ध (Video)

Published On: Jun 03 2018 2:31PM | Last Updated: Jun 03 2018 2:51PMकराड : प्रतिनिधी 

वर्षभरापूर्वी राज्यातील शेतकरी संपावर गेल्यानंतर कर्जमाफीसह शेतकर्‍यांना न्याय देऊ, असे राज्य शासनाकडून सांगण्यात आले होते. मात्र, फसव्या कर्जमाफीसह शेतकर्‍यांना दिलेल्या आश्‍वासनांची पूर्तता न करता शासनाकडून शेतकर्‍यांची दिशाभूल, फसवणूक सुरू आहे. या निषेधार्थ बळीराजा शेतकरी संघटनेकडून रविवारी कराडमध्ये राज्य शासनाचे ‘प्रथम वर्षश्राद्ध’ घालण्यात आले. 

बळीराजा शेतकरी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील, जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला यांच्यासह शेतकरी विशेषत: महिला शेतकर्‍यांनी कराडच्या प्रीतिसंगम घाटावर सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास हे अनोखे आंदोलन केले. वर्षश्राद्धांसाठी आवश्यक विधी करत जोरदार घोषणाबाजी करत राज्य शासनाचा निषेध नोंदवण्यात आला. शेतकरी संपाची दखल न घेतल्यास राज्य शासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन केले जाईल, असे सांगत येत्या एक ते दोन दिवसात शासनाची भूमिका पाहून आंदोलनाबाबतचा पुढील निर्णय घेणार असल्याचेही पंजाबराव पाटील यांनी सांगितले आहे.

व्हिडिओ : प्रेषित गांधी