होमपेज › Satara › जिल्ह्यात वळीव पावसामुळे मशागतींना वेग 

जिल्ह्यात वळीव पावसामुळे मशागतींना वेग 

Published On: Jun 07 2018 2:09AM | Last Updated: Jun 06 2018 11:45PMसातारा : प्रतिनिधी

मृग नक्षत्र अवघ्या एक दिवसांवर येऊन ठेपले असल्याने बळीराजाची धांदल उडाली आहे. पेरणीपूर्व मशागतीची कामे वेगाने सुरू झाली असून शिवारातील वर्दळ वाढली आहे. एकीकडे  कामाची लगबग वाढली असली तरी दुसरीकडे मात्र मजुरांची टंचाई भासू लागली आहे. तरीही शेतातील मशागतीची कामे जोमाने सुरू असल्याने बळीराजा मशागतीच्या कामात व्यस्त झाला आहे.

मे महिन्याच्या शेवटी वळीव पावसाने जिल्ह्याच्या बहुसंख्य भागात जोरदार हजेरी लावली. सतत मुसळधार पाऊस झाला. यामुळे शिवारात नांगरणी, कुळवणीसाठी आवश्यक ओलावा तयार झाला आहे. मशागतीला पूरक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे नांगरटीच्या कामाने गती घेतली आहे. नांगरट करण्यासाठी आता सर्रास ट्रॅक्टरचा  वापर होत आहे. यामुळे ट्रॅक्टरना मागणी वाढली आहे. ट्रॅक्टरच्या सहाय्याने नांगरट करण्यास प्राधान्य देण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. त्याचबरोबर कुळवणीची कामेही जोमाने सुरू आहेत. सकाळी 7 वाजल्यापासून सायंकाळी 7 पर्यंत शिवारात बळीराजाचा आवाज घुमत आहे.

एकाचवेळी  सर्व मशागतीच्या कामांना गती आल्याने मजुरांची टंचाई भासू लागली  आहे. शेतीकामासाठी मजूर मिळविण्यासाठी शेतकर्‍यांना धावपळ करावी लागत आहे. सध्या विविध कार्यक्रमांची देखील धांदल सुरू आहे. त्यातच पेरणी कामाची झुंबड उडताना दिसत आहे. धूळवाफ पेरणी मृग नक्षत्राच्या आधी आटोपण्यात येते. भात पेरणीसाठी संकरीत बियाण्यांना अधिक प्राधान्य देण्यात येत आहे. यामुळे कृषी सेवा केंद्रांच्या समोर शेतकर्‍याची गर्दी दिसत आहे.  

शेतकर्‍यांच्या  घाई गडबडीचा फायदा घेत शेतकर्‍यांची फसवणूक करण्याचा धंदा देखील दुकानदारांकडून करण्यात येत आहे. स्थानिक शेतकर्‍यांकडूनच भात विकत घेऊन ते शेतकर्‍यांना अधिक भावाने विकण्यात येत आहेत.