होमपेज › Satara › शेतकर्‍याच्या मुलाचा युपीएससीत झेंडा 

शेतकर्‍याच्या मुलाचा युपीएससीत झेंडा 

Published On: May 08 2018 8:50AM | Last Updated: May 08 2018 8:50AMशेणोली : वार्ताहर

कोडोली (ता. कराड) येथील  डॉ. जगदीश शंकर जगताप या शेतकर्‍याच्या मुलाने युपीएससीत महाराष्ट्राचा झेंडा रोवला आहे. देशात 304 वा क्रमांक पटकावत त्याने हे यश तिसर्‍या प्रयत्नात खेचून आणले. एकत्रित कुटुंबाचा भक्कम आधार मला कामी आल्याचे डॉ. जगताप यांनी सांगितले.  

शेतकरी कुटुंबातील पार्श्‍वभूमी असणार्‍या डॉ. जगताप यांना व्यापक सेवेचा ध्यास आणि चिकाटीच्या जोरावर हे यश मिळवता आले. आई, वडील, चुलते, चुलती यांनी घेतलेल्या काबाडकष्टातून जगदीश यश मिळवू शकल्याचे अभिमानाने सांगत आहेत. जगताप कुटुंबाची 4 एकर शेतीवर गुजराण चालते. वडील शंकर श्रीरंग जगताप, आई मंगल जगताप, चुलते कृष्णा श्रीरंग जगताप व चुलत्या सुमन जगताप ही मंडळी शेतीचा सर्व भार वाहतात. शेतीच्या जोरावर घरातील चार मुले आणि एक मुलगी त्यांनी उच्चशिक्षित केली.

कृष्णा आरोग्य विद्यापीठातून त्याने दंतचिकिस्ताची वैद्यकीय पदवी घेतली. पदवी घेतल्यानंतर कोडोली व शेणोली स्टेशन येथे दवाखाना सुरु करुन तेथून त्याने आपली आरोग्य सेवा सुरू केली. परंतु आपली सेवा मौखिक आरोग्यपुरती सिमित असल्याची उणीव मनात राहिल्याने त्याने पुढील टप्प्यात आव्हान स्वीकारण्याचे ठरवले. प्रशासकीय सेवेतून प्रभावशाली काम करण्याची ओढ त्यांना लागल्यानंतर त्यांनी आरोग्य सेवेबरोबर यूपीएससीच्या परीक्षांचे प्रयत्न सुरु केले. 

एकत्रित कुटुंबाचा भक्कम आधार मला कामी आल्याचे त्यांनी सांगितले.  जयवंतराव भोसले व डॉ. सुरेश भोसले यांची प्रेरणा मला खूप उपयोगी ठरल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.
 

Tags : farmer son, pass, upsc exam, kodoli, karad, satara news