Sat, Jul 20, 2019 15:23होमपेज › Satara › सातारा : ५७ लाखांच्या बनावट नोटा जप्‍त

सातारा : ५७ लाखांच्या बनावट नोटा जप्‍त

Published On: Jun 14 2018 12:53PM | Last Updated: Jun 15 2018 1:07AMसातारा : प्रतिनिधी

दोनच दिवसांपूर्वी मिरज येथे बनावट नोटा सापडल्या असताना सातार्‍यात त्याचे कनेक्शन समोर आल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने शुक्रवार पेठ, मोळाचा ओढा, मतकर कॉलनी येथून सहा जणांच्या टोळीचा पर्दाफाश करत तब्बल 57 लाख रुपयांच्या बनावट नोटांचे घबाड जप्‍त केले. 

अटक केलेले सर्व संशयित सातार्‍यातील युवक असून पोलिसांनी संगणक, कागद, प्रिंटर असे साहित्य जप्‍त केले आहे. दरम्यान, बनावट नोटांचे घबाड सापडल्याच्या घटनेने सातारा जिल्ह्यासह महाराष्ट्रात खळबळ उडाली असून बुधवारी दै.‘पुढारी’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार बनावट नोटा छपाईचे काम सातार्‍यात होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

अनिकेत प्रमोद यादव (रा. नवीन एम.आय.डी.सी), अमोल अर्जुन शिंदे (रा. गडकर आळी), अमेय राजेंद्र बेलकर (रा. मोळाचा ओढा), राहुल अर्जुन पवार (रा. शाहूपुरी), गणेश भोंडवे (रा. मोळाचा ओढा), (सुनील देसू राठोड रा. मतकर कॉलनी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे.

या घटनेची पार्श्‍वभूमी अशी, मंगळवारी दि. 12 रोजी गौस मोमीन (रा. मिरज) याला बनावट नोटा वितरीत करत असताना सांगली पोलिसांनी अटक केली. प्राथमिक चौकशी केल्यानंतर संबंधित बनावट नोटा शुभम खामकर रा. सातारा या युवकाने दिले असल्याची माहिती समोर आली. मिरज पोलिसांनी सांगली येथे या दोघांविरुध्द बनावट नोटाप्रकरणी गुन्हा दाखल केला. दरम्यान, बनावट नोटा प्रकरणात सातार्‍यातील युवकाचे नाव समोर आल्यानंतर सातारा पोलिस दल खडबडून जागे झाले. बुधवारी एलसीबीच्या पथकाने तत्काळ कारवाईचा फास आवळत शुभम खामकर याची माहिती घेण्यास  सुरुवात केली. या माहितीमध्ये पोलिसांना धक्‍कादायक माहिती समोर आली. त्यानंतर काही संशयितांची उचलबांगडी करण्यात आली.

पोलिस अधीक्षक संदीप पाटील पुढे म्हणाले, बुधवारी एलसीबी पोलिसांची गस्त सुरु असताना कोटेश्‍वर मंदिर परिसरात अनिकेत यादव व अमोल शिंदे हे दोघे बनावट नोटा चालवण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती एलसीबीला मिळाली होती. त्यानुसार एलसीबीच्या टीमने सापळा लावला. दुचाकीवर फिरत असलेल्या या दोघांवर संशय आल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी दोघांकडे तपास केला असता अनिकेतकडे 500 रुपयांच्या 21 व अमोल याच्याकडे 2000 हजार रुपयांच्या 7 बनावट नोटा सापडल्या. दोघा संशयितांकडे अधिक चौकशी केल्यानंतर अमोलने संबंधित बनावट नोटा गणेश भोंडवे याने बाजारात खपवण्यासाठी दिल्या असल्याचे सांगितले.

बनावट नोटाप्रकरणात सातार्‍यात साखळी वाढू लागल्यानंतर एलसीबी पोलिसांनी पथके तयार करुन साखळीमधील संशयितांची उचलाउचली करण्यास सुरुवात केली. गणेश याला मोळाचा ओढा येथून ताब्यात घेतले असता त्याच्या राहत्या घरात एका सॅकमध्ये 2000 हजार रुपयांच्या 1315 नोटा व अपूर्ण छपाई झालेल्या 498 नोटा सापडल्या. पोलिसांनी सर्व घटनास्थळाची पाहणी करुन त्याला बनावट नोटाबाबत माहिती विचारल्यानंतर गणेश याने सुनील राठोड, अमेय बेलकर व राहूल पवार या तिघांनी बनावट नोटा दिल्या असल्याचे सांगितले.

एलसीबी पथकासमोर सुनील, राहुल व अमेय यांची नावे समोर आल्यानंतर त्या तिघांची माहिती घेवून शोध घेण्यास सुरुवात केली. तिन्ही संशयितांच्या घरावर व आजूबाजूला पोलिसांनी छापे टाकले असता 26 लाख 54 हजार 500 रुपयांच्या नोटा सापडल्या. याशिवाय 29 लाख 88 हजार रुपयांच्या अर्धवट तयार केलेल्या नोटा सापडल्या. या सर्व नोटा पाहिल्यानंतर पोलिसांनाही दरदरुन घाम फुटला. 

सर्व रक्‍कम एकत्र करुन त्याची मोजदाद करण्यास सुरुवात केली. सर्व नोटा मोजल्यानंतर या टोळीकडून एकूण 56 लाख 42 हजार 500 रुपयांच्या बनावट नोटा जप्‍त केल्या.  संशयितांची वाहने, मोबाईल असा 1 लाख 34 हजार रुपयांचा मुद्देमालही जप्‍त करण्यात आला आहेे. बुधवारी दिवसभरात एलसीबी पोलिसांनी ठिकठिकाणी हे छापासत्र राबवल्याने त्या त्या ठिकाणी बघ्यांची गर्दी झाली होती. बुधवारी दिवसभरातील या घडामोडींमुळे नवीन एमआयडीसी, गडकर आळी, मतकर कॉलनी, शाहूपुरी, मोळाचा ओढा या परिसरात खळबळ उडाली होती.

बुधवारी रात्री उशीरापर्यंत सातारा एलसीबीची कारवाई पूर्ण झाल्यानंतर घटनास्थळांचा पंचनामा करण्यात आला. घटनास्थळाचे पंचनामे करत असताना पोलिसांनी नोटा छपाईसाठी वापरलेे जात असलेले संगणक, कागद, शाई असे साहित्यही जप्‍त केलेले आहे.  बुधवारी रात्री संशयितांना अटक करुन गुरुवारी न्यायालयात हजर केल्यानंतर पोलिस कोठडीची मागणी केली असता संशयित चौघांना दि. 17 जूनपर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे.

जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि पद्माकर घनवट, सपोनि विकास जाधव, गजानन कदम, पोलिस हवालदार सुरेंद्र पानसांडे, पृथ्वीराज घोरपडे, विजय जाधव, विजय शिर्के, उत्तम दबडे, दिपक मोरे, तानाजी माने, रामा गुरव, विजय कांबळे, मुबीन मुलाणी, शरद बेबले, रुपेश कारंडे, मारुती लाटणे, संतोष पवार, प्रवीण फडतरे, विक्रम पिसाळ, निलेश काटकर, विजय सावंत, संजय जाधव यांनी कारवाईत सहभाग घेतला.

बाजारात किती नोटा वितरित झाल्या..

सातार्‍यात तब्बल 57 लाखांच्या बनावट नोटा जप्‍त झाल्याने सातारा पोलिसांचे अभिनंदन होत आहे; मात्र आतापर्यंत चलनात किती बनावट नोटा वितरित करण्यात आल्या आहेत. सातारा, सांगलीप्रमाणे आणखी कोणत्या जिल्ह्यात नोटा वितरित झाल्या आहेत का? झाल्या असतील तर त्या किती आहेत? याबाबत पोलिसांना विचारले असता अद्याप संशयितांकडे चौकशी, तपास सुरू असल्याने त्यानुसार पुढील कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, प्राथमिक माहितीनुसार संशयित 10 ते 15 रुपयांच्या माध्यमातून नोटांचे वितरण करणार होते. कारण, बनावट नोटांसाठी ए फोर कागद वापरला गेल्याने त्या नोटांवर शंका घेतली जाणार, हे स्पष्ट होते. त्यामुळे एकदम रक्‍कम न वापरता ती नोटांच्या बंडलांमध्ये 10 ते 15 हजार रुपये वापरून फसवणूक करणार असल्याचे समोर येत आहे.

सातारच्या शुभम खामकरला मिरजेत अटक

बनावट नोटा प्रकरणी साताराच्या शुभम संजय खामकर (रा. एमआयडीसी, सातारा) याला गुरुवारी मिरज महात्मा गांधी चौकी पोलिसांनी अटक केली. त्याने मिरजेतील गौस मोमीन याला पाचशे व दोन हजार रुपयांच्या 21 बनावट नोटा दिल्याचे मोमीन याने सांगितले होते. मोमीन याला पोलिसांनी सोमवारी रात्री उशिरा अटक केली होती. त्याच्याजवळ पाचशे व दोन हजार रुपयांच्या बनावट नोटा मिळाल्या होत्या.     

त्या नोटा खपविण्यासाठी खामकर याने गौस याला दिल्या होत्या असे त्याचे म्हणणे आहे. त्यानंतर पोलिसांनी सातारा येथे छापा टाकून खामकरला ताब्यात घेतले होते. त्याला आज अटक करण्यात आली. आज त्याला न्यायालयात हरज करण्यात आले. त्याला एक दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.

यापूर्वी गौस याला तीन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली होती. त्यामुळे गौस व खामकर या दोघांची पोलिस कोठडी शुक्रवारी संपणार आहे. त्यामुळे त्यांना शुक्रवारी मिरज न्यायालयात पुन्हा हजर करण्यात येणार आहे. दरम्यान पोलिसांनी त्या दोघांचीही आज कसून चौकशी केली. 

मिरजेत बनावट नोटा सापडल्यानंतर त्याचे सातारा कनेक्शन पुढे आल्याने तेथेही पोलिसांनी छापा टाकून बनावट नोटांचे मोठे रॅकेट उघडकीस आणले आहे. मात्र मिरजेत सापडलेल्या बनावट नोटांचे कनेक्शन हे सातारा पोलिसांनी उघड केलेल्या बनावट नोटांशी आहे, की नाही ते अद्याप स्पष्ट झालेली नाही. मात्र बनावट नोटा प्रक़रणी सातारा पोलिसांनी जप्त केलेले नोटा छपाईचे मशीन आम्ही तपासासाठी ताब्यात घेऊ असे मिरज महात्मा गांधी चौकी पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक कांबळे यांनी सांगितले.