Wed, Nov 13, 2019 13:00होमपेज › Satara › औषधेच बनावट असल्याचा अहवाल

औषधेच बनावट असल्याचा अहवाल

Published On: Apr 19 2018 1:37AM | Last Updated: Apr 18 2018 10:32PMसातारा : प्रतिनिधी

हिरापूर (ता. सातारा) येथील गर्भपात औषधसाठा प्रकरणाला आता नाट्यमय कलाटणी मिळाली असून, संबंधित औषधे सायकोकेम कंपनीची नसल्याचा अहवाल प्राप्‍त झाला आहे. त्यामुळे एलसीबीने या मूळ प्रकरणात आणखी कलमांची वाढ केल्यामुळे संशयितांना आता आजन्म कारावासाची शिक्षा लागण्याची तरतूद आहे. दरम्यान, अद्याप तिघेजण पसार असून, पोलिस तपास करत आहेत.

बेकायदा गर्भपात औषधसाठाप्रकरणी मार्च महिन्यात विजय प्रकाश संकपाळ, अमीर महमूद खान (दोघे हिरापूर), प्रशांत नामदेव शिंदे (रा. अंबेदरे रोड) व विलास पांडुरंग देशमुख (मलकापूर, ता. कराड) या चौघांवर सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अन्‍न व औषध प्रशासनाच्या पथकाने हिरापूर येथे छापा टाकल्यानंतर हा पर्दाफाश झाला. या ठिकाणी एमटीपी किटसह गोळ्यांचा साठा सापडल्याने खळबळ उडाली.

सातारा तालुका पोलिसांकडून हा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग झाल्यानंतर प्रवीण ऊर्फ बाळासाहेब तुकाराम देशमुख (वय 39, रा. मंगळवार) व विलास पांडूरंग देशमुख (रा. मलकापूर) या दोघांना आतापर्यंत अटक केली असून ते दोघेही सातारा जिल्हा कारागृहात आहेत. 

दरम्यान, पोलिसांनी जप्‍त केलेल्या औषधांचा साठा हा हरिद्वार येथील सायकोकेम या कंपनीच्या नावाचा असल्याने त्या कंपनीच्या पदाधिकार्‍यांना तपासासाठी पोलिसांनी सातार्‍यात बोलवले होते. पोलिसांनी जप्‍त केलेली औषधे तपासणीसाठी पाठवल्यानंतर ती औषधे त्या कंपनीची नसल्याचे समोर आले आहे. कंपनीच्या ब्रँडचा वापर झाला असल्याचे कंपनीने सांगितल्याने आता खळबळ उडाली आहे.

गर्भपाताची सापडलेली औषधेच बनावट असल्याने कायदेशीरदृष्ट्या हे प्रकरण आणखी संवेदनशील बनले आहे. आतापर्यंत एलसीबीने हा गुन्हा त्यांच्याकडे आल्यानंतर प्रथम 328 हे कलम वाढवून लावले होते. या कलमानुसार संशयित आरोपींना जामीन मिळणार नसल्याने एलसीबीने कारवाईच्या दृष्टीकोनातून षटकार मारला होता. आता तर औषधेच बनावट असल्याने एलसीबीने पुन्हा मूळ कलमांमध्ये वाढ केली आहे. त्यानुसार 27 ए, 17 बी, ई ही कलमे वाढीव लावली आहेत. बनावट औषधांच्या संबंधाने या कलमांचा अर्थ असून त्यानुसार आजन्म कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे.

दरम्यान, अद्याप तिघांना अटक न झाल्याने याप्रकरणाची पाळेमुळे आणखी खोलवर असण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, आतापर्यंत 328, 336, 34, सौदर्य प्रसाधने कायदा कलम 17 बी,ई, 18 सी, 18 ए, 27 ए, 27 बी यानुसार हा गुन्हा दाखल झाला आहे. पोनि पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार प्रसन्‍न जर्‍हाड, पोलिस हवालदार  सुरेंद्र पानसांडे, शरद बेबले, विजय कांबळे हे तपास करत आहेत.