Fri, Apr 26, 2019 09:30होमपेज › Satara › थरारक घटनेने पोलिसांसमोर आव्हान

थरारक घटनेने पोलिसांसमोर आव्हान

Published On: Jun 01 2018 2:14AM | Last Updated: Jun 01 2018 1:36AMसातारा : प्रतिनिधी

सातार्‍यात बुधवार नाक्यावर गोळीबाराची थरारक घटना घडल्यानंतर सर्वसामान्यांच्या सुरक्षेचा प्रश्‍न पुन्हा एकदा ऐरणीवर आला. युवकांच्या वादाची ठिणगी थेट गोळीबारपर्यंत गेल्याने ती बंदूक कोठून आणली? सातार्‍यात अशा बंदुका आहेत तरी किती? असा सवाल उपस्थित झाला असून सातारच्या पोलिसांसमोर या घटनेने आव्हान समोर  उभे राहिले आहे. 

बुधवार नाका हा संवेदनशील भाग आहे. याचठिकाणी दोन युवकांमधील वाद तिर्‍हाईत युवतीच्या जीवावर उठल्याने सातारकर असुरक्षित असल्याचे समोर आले आहे. संबंधित जखमी अश्‍विनी ही लहान बाळाला घेवून दुकानात साहित्य आणण्यासाठी गेली होती. पाठीमागे सुरु झालेली भांडणे तिच्या आयुष्यावर उठली. गोळीबार  झाल्यानंतर ती गोळी लागताच अश्‍विनीने सोबत असलेले लहान बाळ सुरक्षित खाली ठेवले. यावेळी तिला सोडवण्यासाठी आलेल्या नातेवाईकांना गोळी लागल्याचे सांगून बाळाला सुरक्षित घ्या, असे विव्हळतच तिने सांगितले. युवतीला व लहान बाळाला वाचवण्यासाठी आलेल्यांवरही संशयिताने बंदूक उगारल्याने व फायरिंग केल्याने घटनेतील गांभीर्य वाढलेले आहे. हा सर्व थरार भरदिवसा डोळ्यासमोर पाहणार्‍यांचीही घाबरगुंडी उडाली.

सातारा पोलिसांनी  नाकाबंदी करुन दुचाकी, चारचाकी व संशयितांकडे कसून चौकशीला सुरुवात केली. सातार्‍यात प्रत्येक ठिकाणी पोलिस आल्याचे पाहून घटना माहित नसणारेही बुचकळ्यात पडले. रात्री उशीरापर्यंत पोलिस या घटनेचा पूर्ण तपासाच्या अनुषंगाने जंगजंग पछाडलेले होते. घटनास्थळी पंचनाम्यासाठी स्वतंत्र पथक, रुग्णालयाबाहेर गस्तीसाठी स्वतंत्र पथक, घटनास्थळ व परिसरातही स्वतंत्र पथक, संशयितांच्या शोधासाठी एक पथक अशी सुमारे सहा पथके तैनात करण्यात आली आहेत. घटनास्थळाचा परिसराचा ताबा पोलिसांनी घेवून पोलिसांनी तो बंदिस्त केला. कारण परिसरातील घटनास्थळावरुन दिलेल्या माहितीनुसार सुमारे तीन राउंड फायर झाले असल्याचे म्हटल्याने त्याठिकाणी गोळ्या कुठे कुठे लागल्या आहेत याची तपासणी पोलिस करत होते. यामुळे रात्री उशीरापर्यंत त्याठिकाणी बघ्यांची गर्दी होती.

सिव्हीलबाबत नातेवाईकांचा आरोप..
गोळीबारमध्ये अश्‍विनी कांबळे गंभीर जखमी झाल्याने उपचारासाठी तिला सिव्हीलमध्ये आणण्यात आले. मात्र याठिकाणी स्ट्रेचर घेवून येण्यासाठी कोणीही नव्हते. कुटुंबियांनी तिला स्ट्रेचरवर ठेवल्यानंतर आतपर्यंत नेण्यासाठीही कोणी नव्हते. जखमीला रुग्णालयात आत नेल्यानंतर आता तज्ञ डॉक्टर नाहीत, पेशंटला बाहेरच्या दवाखान्यात घेवून जावा, अशी धक्कादायक उत्तरे दिल्याने जखमीचे नातेवाईक संतप्त बनले. सिव्हीलच्या या कारभाराचा समाचार नातेवाईकांनी घेवून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही जखमीच्या नातेवाईकांनी पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांच्याकडे केली.