Fri, May 29, 2020 12:03होमपेज › Satara › फेसबुक लाईव्हमुळे सांगोल्याची व्यक्ती सापडली (video)

फेसबुक लाईव्हमुळे सांगोल्याची व्यक्ती सापडली (video)

Published On: Jan 06 2018 2:56PM | Last Updated: Jan 06 2018 3:21PM

बुकमार्क करा
पुढारी ऑनलाईन  : सुशांत पाटील 

सहा वर्षांपासून घरात कुणालाही न सांगता सांगोल्यातील पाचेगाव बुद्रुक येथील दादासो महानवर यांनी घर सोडले. घरच्या परिस्थितीच्या टेन्शनमुळे महानवर यांचे मानसिक खच्चीकरण झालं. पुण्याच्या रस्त्यावर भटकत त्याने रस्त्यावरचं जगणं पसंत केलं. त्याला पुण्याच्या स्माइल प्लस सोशल फौंडेशनने आधार देऊन त्याच्यावर ओढावलेल्या भीषण परिस्थितीचे फेसबुक लाईव्ह केले. 

हे फेसबुक लाईव्ह आटपाडी तालुक्यातील यपावाडीच्या किरण चव्हाण यांनी पाहिले आणि त्यांच्या कुंटुंबियाशी संपर्क साधून तब्बल सहा वर्षानंतर दुरावलेल्या दादासो महानवरला त्याच्या हक्काच्या घरी आणण्यास मदत केली.  

फेसबुकच्या सहकार्याने घडलेल्या या घटनेमुळे महानवर कुंटुबियाचा आनंद गगणात मावेनासा झालाय. तसेच सहकार्य करणार्‍या व्यकींचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. पुण्याच्या स्माईल प्लस सोशल फौंडेशन या संस्थेमार्फत योगेश मालखरे व त्यांच्या सहकार्यांनी मानवतावादी विचार करुन सामाजिक उपक्रमाला गेल्या कित्येक दिवसापासून सुरुवात केली आहे. सिग्नलवर थांबलेले भिकारी, रस्त्यावरुन जाणारे मनोरुग्ण किंवा विविस्त्र अवस्थेत पडलेल्या व्यक्तींच्या चेहर्‍यावर हसू फुलवण्याचे काम 2007 पासून योगेश मालखरे व त्यांचे सहकारी अखंडपणे करत आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील पाचेगाव बुद्रुक येथील अशीच एक व्यक्ती ज्याचं नाव दादासो महानवर असे आहे. मानसिक खच्चीकरण झाल्यामुळे गेल्या सहा वर्षापासून ते रस्त्यावर भीक मागत आपली रोजीरोटी भागवत होते. अंगावर मळलेले कपडे, त्याला दोर्‍या गुंडालेल्या यामुळे त्याच्या शरीरावर जखमा झाल्या होत्या. पुण्याच्या एका रस्त्यावर ते असे निपचित पडले असताना योगेश मालखरे व त्यांच्या टीमने दादा महानवर याची आदराने विचारपूस केली. त्याची चौकशी करुन त्याला स्माईल प्लस सोशल फाउंडेशनमध्ये दाखल केले. त्याची चौकशी करत त्यांच्या अंगावरील दोर्‍या काढण्यात आल्या. त्याच्या अंगावर प्रचंड जखमा झाल्या होत्या, त्याला मलमपट्टी करण्यात आली. 

ह्या कृती करत असताना स्माईल प्लस सोशल फाउंडेशने हे सगळे दृश्य आपल्या फेसबुक पेजवरुन लाईव्ह केले. हे फेसबुक लाईव्ह आटपाडीतील यपावाडी गावातील व्यावसायिक किरण चव्हाण यांनी पाहिले. त्यांनी लगेच आपला वैभव पवार व पाचेगाव बुद्रुक येथील घोडके सर यांच्याशी संवाद साधला. 

यावेळी घोडके सरांनी दादा महानवर यांचे बंधू गोविंद महानवर यांच्याशी संवाद साधला. तेव्हा त्यांच्याकडून दादा महानवर हे सहा वर्षापासून कुणालाही न सांगता घरातून बाहेर पडल्याची माहिती दिली. यावेळी किरण यांनी गोंविद यांना तुमचा बंधू फेसबुकमुळे सापडला असल्याचे सांगताच त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही.  लवकरच ते पुण्याला जाऊन आपल्या बंधूला घरी घेऊन येणार आहेत.