Mon, May 27, 2019 08:11होमपेज › Satara › डोळा गेला, रक्‍त सांडले पण पोलिस नाही हटले

डोळा गेला, रक्‍त सांडले पण पोलिस नाही हटले

Published On: Jul 27 2018 1:26AM | Last Updated: Jul 26 2018 11:00PMसातारा : प्रतिनिधी

राजधानी सातार्‍यातील मराठा क्रांती ठोक मोर्चा व ठिय्या आंदोलनानंतर आंदोलकांसह काही समाजकंटकांनी महामार्ग रोखून जाळपोळ, तोडफोड सत्राला सुरुवात केल्यानंतर सातारा जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांच्यासह सर्वच पोलिस परिस्थितीला जाँबाजपणे सामोरे गेले. पोलिस दलाचे कॅप्टन असलेल्या एसपींच्या हातातून रक्‍त येत होते, पोलिस हवालदार निलेश जांभळे यांचा डोळाच निकामी झाला तर एम.एम.शेख यांचा पाय मोडला, याशिवाय अनेक पोलिस जायबंदी झाले असतानाही त्यांनी यशस्वीपणे परिस्थिती हाताळत दंगाधोप्यावर नियंत्रण मिळवले. पोलिस टीमचे हे शौर्य जिल्हावासियांची वाहवा मिळवणारेच ठरले. 

बुधवारी जिल्हा पोलिसांसह सातारकरांनी मोठा बाका प्रसंग पाहिला. पोलिसांचा सकाळपासूनच बंदोबस्त होता. प्रत्यक्ष मोर्चाला सुरुवात झाल्यानंतर तो संपेपर्यंतच्या चार तासाच्या कालावधीत कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. या चार तासामुळे पोलिसांसह सर्वजणच सुखावले होते. मात्र अवघ्या पंधरा मिनिटांत होत्याचे नव्हते झाले. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास पोलिस दल पुन्हा अलर्ट झाले. सातारा शहराऐवजी महामार्गावर गडबड झाल्याचे वायरलेस मेसेज पोलिस मुख्यालयातून एकामागून एक धडकू लागल्यानंतर पोलिसांच्या काळजाचाही ठोका चुकला. अशातच पोलिस दलाचे कॅप्टन एसपी संदीप पाटील हे स्वत:च दगडफेकीत जखमी झाल्याचे समोर आल्यानंतर मात्र पोलिस हडबडून गेले.

एसपी संदीप पाटील हे मराठा समन्वय समितीच्या पदाधिकार्‍यांना घेवूनच महामार्गावर जमावाला शांततेचे आवाहन करत असताना पुलाच्या खालच्या दिशेने तुफान दगडफेकीला सुरुवात झाली. अशा स्थितीमध्येही ते आंदोलकांना सामोरे जावून गैरकृत्यापासून परावृत्त करत होते. आंदोलक घटनास्थळी वाढत होेते. दगडांसह काचांच्या बाटल्याही पडू लागल्याने क्षणाक्षणाला उपस्थित सर्वांच्या अंगावर अक्षरश: काटे उभे राहिले. अशातच एसपी संदीप पाटील जखमी असतानाही  जागा सोडत नसल्याने अखेर मराठा समन्वय समिती व बंदोबस्तासाठी असणार्‍या पोलिसांनी त्यांना गोल कडे केले व तेथून बाहेर पडण्यास प्रवृत्त केले.

पाहता पाहता आंदोलन चिघळत गेले असतानाच पोलिस मोटर वाहनचे चालक निलेश जांभळे पोलिसांची कुमक घेवून घटनास्थळी पोहचले. यावेळी जमावाने दगड भिरकवण्यास सुरुवात केल्यानंतर व्हॅनमध्ये असलेल्या जांभळे यांच्या डोळ्याला इजा पोहचली. त्यांच्या डोळ्याचे बुभूळच बाहेर आले व मोठ्या प्रमाणात रक्‍तस्त्राव झाल्याने इतर पोलिस त्यांना पोलिस व्हॅन सोडण्यासाठी ओरडत होते. मात्र अशा परिस्थितीमध्येही जांभळे यांनी जखमी डोळ्यावर एक हात ठेवून दुसर्‍या हाताने स्टेअरिंग सांभाळत आपली गाडी पेटू नये, आणखी फुटू नये, यासाठी त्या परिस्थितीतून बाहेर काढली.

सातारा पोलिस उपविभागीय कार्यालयातील पोलिस हवालदार एम.एम.शेख हे देखील महामार्गावर बंदोबस्तासाठी डीवायएसपी गजानन राजमाने यांच्या  पथकात होते. जमावाला काबू करण्यासाठी ते प्रयत्न करत होेते. संरक्षणासाठी त्यांच्याकडे हेल्मेट, लाठी होती. मात्र आंदोलकांच्या दगडफेकीत त्यांच्या पायाचा दगडाने वेध घेतला. एक मोठा दगड त्यांच्या डाव्या पायाला लागल्यानंतर ते त्या परिस्थितीतही स्वत:ला सावरत आंदोलकांना हुसकावत होते. मात्र दोन पावले टाकल्यानंतर ते जमिनीवरच कोसळले. त्यातूनही ते उठून प्रतिकार करण्याचा प्रयत्न करत होते मात्र त्यांना जागेवर उठता येईना. अखेर दोन पोलिसांनी त्यांना उचलून घेत जखमी अवस्थेत उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.  याशिवाय पोलिस संदीप साबळे व संजय साबळे हे सख्खे मावस भाऊदेखील जखमी झाले असून त्यांच्यावरही उपचार सुरु आहेत.

दरम्यान, पोलिस दलातील हे दोन्ही पोलिस गंभीर जखमी झाले असून एसपी संदीप पाटील यांच्यासह तब्बल 32 पोलिस अधिकारी, कर्मचारी जखमी झाले आहेत. प्रामुख्याने पोलिसांच्या हात, पाय, पाठीला प्रामुख्याने दगड लागले आहेत. याशिवाय काही जणांच्या डोक्यालाही लागले असून गेली 48 तास पोलिस सलग बंदोबस्तामध्ये आहेत. बाका प्रसंगातही संदीप पाटील व त्यांच्या टीमने दाखवलेले शौर्य पोलिस दलाची प्रतिमा आणखी उंचावून गेली.