Mon, Jul 15, 2019 23:40होमपेज › Satara › विस्तार अधिकार्‍यांच्या कामाबाबत साशंकता?

विस्तार अधिकार्‍यांच्या कामाबाबत साशंकता?

Published On: Apr 07 2018 1:37AM | Last Updated: Apr 06 2018 8:17PMसातारा : प्रतिनिधी

पंचायत समितीच्या विस्तार अधिकार्‍यांनी पंचायत समिती मुख्यालयामध्ये आठवड्यातील प्रत्येक सोमवारी व शुक्रवारी उपस्थित रहावे मात्र, या दोन दिवसांव्यतिरिक्त अन्य दिवशी पंचायत समिती मुख्यालयात उपस्थित राहण्याची सक्‍ती करू नये, तसेच ग्रामविकास विभागाच्या आदेशानुसार प्रत्येक महिन्यात कमीत कमी 10 ग्रामपंचायतींची तपासणी त्यांनी करणे आवश्यक आहे. मात्र, याची काटेकोरपणे अंमलबजावणी विस्तार अधिकारी करतात का? याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. 

विस्तार अधिकारी (पंचायत) यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील  ग्रामपंचायतीमध्ये दौर्‍यातील 180 दिवसांपैकी 120 दिवस रात्रीचे मुक्‍काम करावयाचे असतात मात्र हा आदेश संबंधित अधिकारी कितपत पाळतात हे गुलदस्त्यातच आहे. ग्रामपंचायतींनी त्यांच्या  कार्यक्षेत्रात हाती घेतलेल्या विविध विकासकामांचा आढावा घेणे व जेथे कामाची प्रगती समाधानकारक नाही किंवा प्रत्यक्ष जागेवर काही अडचणी निर्माण झाल्या असल्यास त्याचे निराकरण करणे, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांना नेमून दिलेली कामे व कर्तव्ये समाधानकारक पार पाडतात की नाही याची तपासणी करणे, ग्रामपंचायत स्तरावरील प्रशासकीय कामकाज, वित्तीय व सेवाविषयक बाबी शासनाने ठरवून दिलेल्या नियमावलीनुसार होतात की नाही याची पाहणी करणे, जिल्हा परिषद, पंचायत समितीमार्फत शासकीय व स्थानिक स्वरूपाच्या योजनांचा प्रसार स्थानिक प्रशासन व लोकांशी संपर्क साधून करणे, स्थानिक लोक व लोकप्रतिनिधी यांचा विविध विकासाच्या योजना कार्यान्वीत करण्यासाठी दौरे व तपासणीचे नियोजन केले आहे.

ग्रामपंचायत पातळीवर केंद्र व राज्य शासनाच्या  अनेक योजना राबविण्यात येतात. सध्या 1 एप्रिलपासून ग्रामपंचायतीचे 1 ते 33 नमुन्यातील अभिलेख ऑनलाईन पध्दतीने ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत व ग्रामसेवकांवरील  कामांचे पर्यवेक्षण अत्यंत प्रभावीपणे  होणे जरूरीचे आहे. जिल्हा व तालुकास्तरावरील विविध  बैठकांमधून निदर्शनास आले आहे की,  विस्तार अधिकारी (पंचायत) यांना पंचायत समिती कार्यालयात आकडेवारी संकलित करणे, वरिष्ठ कार्यालयाकडून मागविण्यात येणारी माहिती तयार करणे, तक्रारीचा चौकशी अहवाल पंचायत समितीकडे सादर केल्यानंतर वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यासाठी पंचायत समिती स्तरावर अहवाल तयार करणे अशा अनेक कामांसाठी दररोज कोणत्या ना कोणत्या कारणाने  पंचायत समितीमध्ये उपस्थित राहण्यासाठी आग्रह धरण्यात येत आहे.

यामुळे विस्तार अधिकारी (पंचायत) यांच्याकडे असलेल्या कामावर विपरीत परिणाम होत आहे.पंचायत समितीकडे ग्रामपंचायतींशी संबंधित अनेक प्रकारचे अर्ज येत असतात. त्याची जबाबदारी विस्तार अधिकारी यांच्यावर टाकली जाते. मात्र येथून पुढे याबाबतची कार्यवाही प्रशासन अधिकारी, सहायक प्रशासन अधिकारी, अर्थ विभाग व संबंधित लिपिक यांच्यामार्फत करण्यात यावी जेणेकरून ग्रामपंचायतीशी संबंधित कामे करण्यास विस्तार अधिकार्‍यांना वेळ मिळणार आहे. तसेच विभागीय आयुक्तांनी ग्रामसेवकांच्या कामकाजाबाबत दिलेल्या सूचनांचे पालन होते का नाही यावर नियंत्रण ठेवण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी  आदेशाद्वारे दिल्या आहेत.

Tags : Satara, extension officers, present, Monday, Friday, force, present,  two, days