Fri, Jun 05, 2020 12:51होमपेज › Satara › आयुष्यभर विद्यार्थी म्हणून जगा

आयुष्यभर विद्यार्थी म्हणून जगा

Published On: Sep 20 2019 1:45AM | Last Updated: Sep 19 2019 8:02PM

ex minister pruthviraj chavhanकराड : प्रतिनिधी

नोकरी, उद्योग आणि राजकारणात आव्हाने आहेत. तरुणांनी या क्षेत्रामध्ये संधी शोधत असताना तुम्ही त्याकडे कोणत्या नजरेने पाहता हे खूप महत्वाचे आहे. तुम्हाला आयुष्यभर विद्यार्थी म्हणून राहता आले पाहिजे, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. येथील शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालयात युवा संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी प्रभारी प्राचार्य डॉ. सुभाष शेळके यांची प्रमुख उपस्थिती होती. 

विद्यार्थ्यांनी आ. चव्हाण यांना रोजगार, देशासमोरील आव्हाने, कराडचे स्वप्न यासह अनेक प्रश्‍न विचारले. त्यास त्यांनी समर्पकपणे उत्तरे दिली. आ. चव्हाण यांनी आपल्या विद्यार्थी दशेपासूनच्या वाटचालीमधील टप्पे विद्यार्थ्यांसमोर उलगडले. 

युवकांना आपल्याला काय करायचे आहे हे पहिल्यांदा ठरवता आले पाहिजे. स्वतःचे किमान कौशल्य विकसित केले पाहिजे. तरच सर्वकाही शक्य आहे. कोणतेही क्षेत्र तुम्हाला यशस्वी करायचे असेल, तर त्याआधी तुम्हाला स्वतःला सिध्द करता आले पाहिजे. मला आमदार म्हणून मतदारसंघाशी कनेक्ट व्हायची संधी मिळाली. ज्या लोकांनी मला इथपर्यंत पोहचवले त्यांच्यासाठी मला खूप काम करता आले. 
राजकारणात टप्प्या-टप्प्याने जावे लागते. ते टप्पे मला यशस्वीपणे पेलता आले. मी केंद्र व राज्यात मंत्री असताना लोकहितासाठी सूक्ष्मपणे काम केले. राज्यात आल्यानंतर कराड दक्षिण व उत्तर मतदारसंघात एकत्रित असा अठराशे कोटी रुपयांचा निधी आणला. याचे मोठे समाधान वाटते. मला पुन्हा संधी मिळाल्यास मी कराड परिसराचे स्वरुप बदलल्याशिवाय राहणार नाही.

कराडची शैक्षणिक गुणवत्ताही उच्च आहे. कराडच्या शैक्षणिक प्रगतीसाठी जे काही करता येईल, त्याकडे माझे लक्ष आहे. भविष्यात कराड जिल्हा व्हावा व कराड परिसरात आयटी पार्कची उभारणी करण्याआधी कराड भोवतीच्या सर्व सुविधा विकसित झाल्या पाहिजेत. त्याचा पहिला टप्पा मी रस्ते चौपदरीकरणाच्या माध्यमातून पूर्ण केला आहे. 

देशातील अर्थव्यवस्थेचा विकासदर दहा टक्क्यापर्यंत नेणे फार मोठे आव्हान आहे. 5 टक्के अर्थिक विकास दराने देशाची प्रगती होणार नाही. बँकांमध्ये 73 हजार कोटींचे घोटाळे झाले आहेत. मेक इन इंडिया, मॅगनेटीक महाराष्ट्राच्या घोषणा केल्या त्या कुठे आहेत. सरकारने योग्य निर्णय घेतले नाहीत. काळजी वाटावे असे चित्र सध्या दिसत आहे, असेही आ. चव्हाण म्हणाले.