Tue, Jul 16, 2019 09:51होमपेज › Satara › वीज कार्यालयात शेतकरी आत्महत्येचा प्रयत्न

वीज कार्यालयात शेतकरी आत्महत्येचा प्रयत्न

Published On: Apr 12 2018 1:18AM | Last Updated: Apr 11 2018 11:04PMकराड : प्रतिनिधी 

शेतीला मिळणार्‍या अपुर्‍या वीज पुरवठ्यामुळे संतप्त झालेल्या शेतकर्‍यांनी बुधवारी वीज कंपनीच्या ओगलेवाडी येथील कार्यालयाचे दरवाजे बंद करून अधिकार्‍यांना कोंडले. यावेळी करवडी ता. कराड येथील अमित डुबल यांनी वीज कंपनी कार्यालयाच्या इमारतीवर चढून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या प्रकाराने एकच खळबळ उडाली. 

आंदोलनात करवडी, वाघेरी, बोरजाईमळा, मेरवेवाडी येथील शेकडो शेतकरी सहभागी झाले होते. तीन महिन्यांपासून या भागात शेती पंपांना वीज पुरवठा सुरळीत झालेला नाही. रात्री दिड ते दोन तास वीज मिळते. ती ही वारंवार खंडीत केली जाते. याचा परिणाम शेतीवर झाला असून ऊस पिकासह अन्य पिकेही धोक्यात आली आहेत. ऐन उन्हाळ्यात पाण्याअभावी संपूर्ण शेतीच धोक्यात आली आहे. कॅनॉलला पाणी आहे, परंतु वीज उपलब्ध नसल्याने शेतीला पाणी देता येत नाही, ही शेतकर्‍यांची ओरड आहे. 

याबाबत वीज कंपनी कार्यालयात तक्रारी करूनही अधिकारी टोलवाटोलवी करत होते. त्यामुळे शेतकरी अक्षरशः वैतागले होते. शेकडो शेतकरी याबाबत अधिकार्‍यांना जाब विचारण्यासाठी ओगलेवाडी येथील वीज कंपनीच्या कार्यालयात आले. मात्र अधिकारी दाद घेत नसल्याचे लक्षात येताच संतप्त झालेल्या शेतकर्‍यांनी कार्यालयाचे दरवाजे बंद करून अधिकार्‍यांना आता कोंडले. याच वेळी करवडी येथील अमित डुबल यांनी वीज कंपनीच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र युवकांनी तत्परता दाखवत त्यांना रोखले. त्यामुळे एकच खळबळ उडाली. 

वडोली निळेश्‍वर येथील ट्रान्सफार्मवर लोड शिल्लक असताना व तेथून लाईन टाकली असताना ती अद्याप कार्यान्वीत न केल्याने करवडी, मेरवेवाडी, वाघेरी, बोरजाईमळा भागात वीज पुरवठा पुरेशा प्रमाणात होत नाही. त्यामुळे या भागातील शेती धोक्यात आली आहे. त्यातच उन्हाची तिव्रता वाढल्याने पिके वाळू लागली आहेत. या परिस्थितीत कॅनॉलला पाणी आहे मात्र वीज नसल्याने ते शेतीला देता येत नसल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. यातूनच त्यांनी बुधवारी अचानक वीज कंपनी कार्यालयाचे दरवाजे बंद करून कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केले. 

या प्रकारानंतर त्या ठिकाणी पोलिसांना पाचारण करण्यात आले. वीज कंपनीच्या अधिकार्‍यांनी वडोली निळेश्‍वर फिडरवरून या विभागाला वीज पुरवठा केला जाईल, असे लेखी आश्‍वासन दिल्यानंतर शेतकर्‍यांनी कार्यालयाचे दरवाजे उघडले. या प्रकाराने तेथे तणाव निर्माण झाला होता.

 

Tags : karad, karad news, electricity office, Farmer, suicide,