Wed, Feb 26, 2020 20:46होमपेज › Satara › वीज दरवाढीने उद्योजक आंदोलनाच्या पवित्र्यात

वीज दरवाढीने उद्योजक आंदोलनाच्या पवित्र्यात

Published On: Dec 14 2018 1:53AM | Last Updated: Dec 13 2018 8:48PM
सातारा : विशाल गुजर

महावितरणने इंजिनिअरिंग आणि फौंड्री उद्योगासाठी सुमारे 20 टक्के दरवाढ लादली आहे. या दरवाढीमुळे हे उद्योग अडचणीत येणार असून यापुढे होणारी मोठी गुंतवणूक थांबणार असल्याचे चित्र दिसत आहे. सरकारने जीएसटीच्या माध्यमातून एक कर प्रणाली पद्धत सुरू केली असताना इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात वीज दरवाढ केल्यामुळे राज्यासह जिल्ह्यातील उद्योजक मेटाकुटीला आले आहेत. दरम्यान या वीज दरवाढीच्या विरोधात उद्योजक रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहेत.

औद्योगिक विश्‍वात असंतोष खदखदत आहे. पश्‍चिम महाराष्ट्रात सर्वात जास्त फौंड्री व्यवसाय आहे. त्यामध्ये साधारणत: सातारा, कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यांचा समावेश आहे. सातारा जिल्ह्याचा विचार करता 12 हजार उद्योजकांची नोंदणी असून सुमारे 1.5 लाख कामगारांना थेट, तर 2 लाख कामगारांना अप्रत्यक्ष रोजगार मिळाला आहे. सातारा जिल्ह्याचा विचार करता इंजिनिअरिंग उद्योगही मोठ्या प्रमाणात आहे. जिल्ह्यात 1,630 इंजिनिअरिंग वर्कशॉप, 100 फौंड्री आणि विविध मशिनरी बनवणारे 6500  उद्योजक कार्यरत आहेत. या सर्वांच्या माध्यमातून सुमारे 1.5 लाख कामगारांना रोजगार मिळाला आहे. 

गेल्या काही वर्षांत इंजिनिअरिंग आणि फौंड्री  उद्योजकांना फारसे चांगले दिवस नव्हते.  मात्र, काही महिन्यांपासून या उद्योगांना अच्छे दिन आले आहेत. त्यामुळे सातारा जिल्हयात सुमारे 350-400 कोटींची गुंतवणूक या उद्योगात होणार आहे. त्यादृष्टीने उद्योजक पावले उचलत आहेत. मात्र, वाढीव वीज दराच्या शॉकमुळे उद्योजकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून वीज दरवाढ मागे न घेतल्यास ही गुंतवणूक थांबणार आहे. ही गुंतवणूक थांबल्यास रोजगाराची संधी बुडण्याची शक्यता आहे. 

सध्या वस्त्रोद्योग अडचणीतून मार्गक्रमण करीत आहे. तुलनेत या दोन उद्योगातील कामगारांना थोडासा दिलासा मिळाला होता. मात्र, वीज दरवाढ कायम राहिल्यास त्यांच्यावरही बेरोजगारीची कुर्‍हाड कोसळण्याची शक्यता आहे. चोरी, भ्रष्टाचार करणार्‍यांच्या पाठीशी महावितरण व सरकार असून प्रामाणिक कर भरणार्‍या फौंड्री आणि इंजिनिअरिंग उद्योगाला मात्र सरकार आणि महावितरणकडून सहकार्य मिळत नसल्याची खंत उद्योजक बोलून दाखवत आहेत.

दरम्यान याबाबत गुरुवार दि. 20 डिसेंबर रोजी मंत्रालय पातळीवर एक निर्णय होणार असल्याचे उद्योजकांकडून सांगण्यात आले. या निर्णयाकडे उद्योजकांचे लक्ष लागून राहिले आहेे. हा निर्णय उद्योजकांच्या विरोधात असेल, तर दि. 21 पासून संघर्षाची तयारी उद्योजकांनी केली आहे. यापूर्वी कधीही रस्त्यावर न उतरलेले हे उद्योजक वीज दराच्या प्रश्‍नावर मात्र आक्रमक झाले आहेत.

वीज दरात राज्या राज्यात फरक कसा?

महाराष्ट्रात सध्या 9 ते 9.50 रुपये दराने वीजपुरवठा केला जातो. तुलनेत शेजारील गुजरात राज्यात 7 ते 7.50, कर्नाटकात 8 ते 8.50, गोव्यात 5 ते 6 रुपये दराने वीजपुरवठा केला जातो. महाराष्ट्राचा विचार करता मराठवाडा आणि विदर्भाला दोन रुपये कमी दराने वीज मिळते. वास्तविक, महाराष्ट्रात सर्वांना समान दराने वीजपुरवठा करणे अपेक्षित असताना मराठवाडा, विदर्भाला वेगळा न्याय दिला जातो. वाढलेल्या वीज दराचा थेट परिणाम उत्पादन खर्चावर होत असून उत्पादनांच्या किंमती भरमसाठ वाढणार आहेत.