Fri, Jun 05, 2020 10:45होमपेज › Satara › मंडळांना पावणार राजकीय ‘लक्ष्मी’

मंडळांना पावणार राजकीय ‘लक्ष्मी’

Published On: Sep 28 2019 1:27AM | Last Updated: Sep 27 2019 11:33PM
कुडाळ : इम्तियाज मुजावर

विधानसभेचे धुमशान आता रंगात येवू लागले असून घटस्थापनेपासून खर्‍या अर्थाने निवडणूक रंगढंग दाखवू लागली आहे. नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाल्यामुळे या काळात निवडणुकीचाच माहोल राहणार असून सार्वजनिक मंडळांच्या कार्यकर्त्यांवर उमेदवार मात्र प्रसन्‍न असल्याचे चित्र आहे. निवडणुकीमुळे यंदा या मंडळांना राजकीय लक्ष्मी पावणार असल्याने मंडळांचे कार्यकर्तेही जोषात आहेत. 

विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला आहे. तर अवघ्या एका दिवसाने नवरात्रोत्सवाला प्रारंभ होणार आहे. या उत्सव काळातील 9 दिवस उमेदवारांच्या प्रचारासाठी व जोरदार वातावरण निर्मितीसाठी फलदायी ठरणार आहेत. त्याद‍ृष्टीने प्रमुख उमेदवारांसह सर्वच उमेदवारांनी नवरात्रोत्सवाचा राजकीय लाभ उठवण्याचे नियोजन केल्याचे दिसते. निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू असल्याने गावागावातील वातावरण चांगलेच तापले आहे. याच धुमशानात गावोगावी नवरात्रोत्सवातील कार्यक्रमांची तयारी सुरु आहे.  सार्वजनिक मंडळांचे पदाधिकारी ‘फायनान्सर’ उमेदवारांना धरुन आहेत. देवीची मूर्ती, सजावट साहित्य, मंडप व महाप्रसादासाठी उमेदवारांनीच ‘फायनान्स’ केले असल्याचे चोरीचुपके बोलले जात आहे.  यंदाचा नवरात्रोत्सव कार्यकर्त्यांसाठी यादगार ठरणार आहे.  असे असले तरी अतिरिक्‍त खर्चाचा बोजा पडत असल्याने गोड महाप्रसाद सुध्दा उमेदवारांना ‘तिखट’ लागू लागला आहे. मात्र, राजकीय वाटचाल सुकर होण्यासाठी दुर्गामातेचे आशीर्वाद आपल्याला कसे मिळतील हे दाखवण्यासाठीही अनेक उमेदवार श्रद्धाळू बनले आहेत. 

निवडणुकीत आपलाच जय झाला पाहिजे, यासाठी उमेदवारांनी निवडणुकीसाठी  स्वत:चे बजेट वाढवले आहे. मतदार संख्या, विजयासाठी आवश्यक मतदान, प्रतिस्पर्ध्याची ताकद, त्यांच्याकडून केला जाणार खर्च  आदी सर्वांचा विचार करून निवडणूक बजेट तयार केले असल्याचे चित्र आहे. नवरात्रोत्सवाला गुरूवारपासून सुरूवात झाल्याने राजकीय कार्यकर्त्यांबरोबरच नवरात्रोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांचीही धांदल सुरू झाली आहे. बहुतांश मंडळांचा  मोठा खर्च प्रमुख उमेदवारांनी उचलला आहे. तर काहींनी विद्युत रोषणाई, रास दांडिया, गरबा या कार्यक्रमांचा खर्च उचलला आहे. याशिवाय मातब्बर उमेदवारांनी महाप्रसादाचा खर्च उचलला आहे. त्यामुळे यावर्षीचा नवरात्रोत्सवात दुर्गादेवी उमेदवारांना पावणार का? हे निकालानंतरच कळेल. मात्र, काहीही असो या वर्षीच्या नवरात्रोत्सवात कार्यकर्त्यांना राजकीय ‘लक्ष्मी’ पावणार आहे. 

गल्‍ली-गल्‍लीतून, वाड्या-वाड्यातून  जेवणाच्या पंगतीही झडू लागल्या आहेत. एका जेवणावळीसाठी मोठा खर्च उचलावालागत आहे.  जेवणावळीसह मतदारांच्या विविध मागण्या पूर्ण करताना उमेदवारांची  चांगलीच दमछाक होताना दिसत आहे. 

आम्ही तुमचेच आहोत...

निवडणुका ऐन दसरा, दिवाळीतच आल्याने या सणासुदीला कार्यकर्ते जोशात आहेत. विविध कार्यक्रमांना  मतदार व नागरिक  जमा करण्यासाठी मोठी कसरत करताना अनेक उमेदवारांना आपले हात सैल सोडावे लागत असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. धुमशानीच्या काळातच नवरात्रोत्सव आल्याने स्थानिक नेतेमंडळी व उमेदवारांना वारेमाप खर्च करावा लागत आहे. बहुतांशी सार्वजनिक मंडळांनी महाप्रसादाला ‘फायनान्सर’ सापडल्याने ‘मेन्यू’ची लिस्ट वाढवली आहे. सार्वजनिक मंडळांच्या पदाधिकार्‍यांनीही उमेदवारांना कोंडीत पकडण्याचे मनसुबे रचले आहेत. उमेदवारांना ‘आम्ही तुमचेच आहोत’ हे पटवून देताना मंडळ व कार्यकर्त्यांसाठी काहीतरी पदरात पाडून घेण्यासाठी प्रयत्न होताना दिसत आहेत. एकूणच नवरात्रोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांची चांदी आहे.