Wed, Feb 26, 2020 22:17होमपेज › Satara › जनतेचं झालंय खेळणं

जनतेचं झालंय खेळणं

Published On: Sep 27 2019 2:18AM | Last Updated: Sep 26 2019 11:44PM

संग्रहित छायाचित्रविशाल गुजर

सध्या सर्वत्र निवडणुकीचे वारे जोर जोरात वाहू लागले आहे. निवडणूक म्हटले की प्रचाराची रणधुमाळी, वारेमाप पैशाची उधळपट्टी, कार्यकर्ते, मतदार फोडण्याचे तंत्र, व्यासपीठावरून न होणार्‍या विकासकामांचा आरडाओरडा, एकमेकांबद्दलच्या उकाळ्या-पाकाळ्या, फक्‍त  दुसर्‍यांचेच कामे न केलेले हेवेदावे अशा प्रकारच्या गोष्टींना उधाण आलेले असते. मात्र, आपणही तेच केलेले असते, करणार असतो. हे मात्र ते धुतल्या तांदळासारखे साफ विसरतात. केवळ सत्ता, प्रतिष्ठा  मिळवण्यासाठीच तर हा सगळा खटाटोप, पूर्वीसारखी सरळमार्गी निवडणूक  राहिलीच नाही. पूर्वीच नेत्यांचं प्रेम, कार्यकर्त्यांविषयी जवळीक, कामाचा उरक, मतदारांविषयीची तळमळ असं राजकारण राहिलेलंच नाही.

आधुनिक जगाचं हे बिघडलेलं राजकारण सर्वसामान्य जनतेला त्रासदायक, दु:खदायकच ठरते आहे. पूर्वीच्या राजकारणात आणि आत्ताच्या राजकारणात खूपच तफावत आहे. पूर्वी गरजेचं राजकारण होतं तर आताच गरजेपुरतं झालय. त्याग, योगदान, प्रामाणिकता, एकनिष्ठा यांना तिलांजली मिळालीय. गुलाल तिथं खोबरं होवून स्वार्थाचं राजकारण चाललंय. आजचा कार्यकर्ता उद्या तिथेच असेल असे नाही. आजचा नेता उद्या त्याच पक्षात दिसेल असे नाही. आजचा मतदार उद्या त्याच नेत्याला मत देईल याची ग्यारंटी नाही. असे हे बेरीज-वजाबाकी, गुणाकाराचं राजकारण पूर्वी होतं का? यांच्या खेळात जनतेचं मात्र खेळणं झालंय हे नक्‍की. सरकारी यंत्रणा, कार्यकर्त्यांची मोट बांधून नेतेमंडळी टोपी फिरू राजकारण करीत सगळ्याचा खेळखंडोबा करीत असतात.

मतदारालाही या चालीकडे डोकावायला वेळ नाही आणि तशी त्याची मानसिकताही नाही. परिणामी व्हायचे तेच होतय. एखादं चांगलं होणार काम होत असलं तरी कुठून तरी राजकीय वारं घोंगावत येतं आणि त्या कामाला खोडा घालतं. परिणामी बुडत्याचा पाय अधिकच खोलात जातो. पण हे कुणी कुणाला सांगायचं? जो तो म्हणतोय माझचं लाल ! यामुळेच तर सर्व राजकारण बिघडलंय म्हणूनच सगळंच तंत्र बिघडलंय. सगळ्या समाजकारणाचं  मूळ या बिघड्या राजकारणात आहे. समाज ढवळाढवळीचं मूळही राजकारणातच आहे. राजकारणाने फक्‍त राजकारणच नव्हे तर सर्वच क्षेत्रात बिघडाबिघडी केलीय. काय घडतंय, काय बिघडतंय याचा ताळमेळच राहिला नाही. ग्रामपंचायतीपासून दिल्ली दरबारापर्यंत राजकीय वारं ढवळलंय.