Mon, Apr 22, 2019 11:43होमपेज › Satara › कराडमध्ये शिक्षण महोत्‍सवाला ग्रंथ दिंडीने प्रारंभ

कराडमध्ये शिक्षण महोत्‍सवाला ग्रंथ दिंडीने प्रारंभ

Published On: Feb 26 2018 12:39PM | Last Updated: Feb 26 2018 12:34PMकराड : प्रतिनिधी 

येथील पंचायत समितीकडून आयोजित तीन दिवसीय शिक्षण महोत्सवाला सोमवारी प्रारंभ झाला. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळ परिसरातील प्रीतिसंगम परिसरातून काढण्यात आलेल्या ग्रंथदिंडी व शैक्षणिक चित्ररथांनी प्रारंभ झाला.

येथील जुन्या कोयना पुलानजीक २६ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी या कालावधीत शिक्षण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी सहभाग घेतला आहे. सोमवारी सकाळी काढण्यात आलेल्या ग्रंथदिंडीत उंडाळे विभागातील शाळांनी छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या मावळ्यांची प्रतिकृती साकारात इतिहासाला उजाळा देण्याचा प्रयत्न केला. मसूर विभागातील शाळांनी कल्पना चावला यांना अभिवादन करत अवकाश यान हा चित्ररथ साकारला होता. वडगाव हवेली परिसरातील शाळांनी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र चित्ररथाच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला होता. सदाशिवगड विभागातील शाळांनी स्वच्छतेचा संदेश देत स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. कोळे विभागातील शाळांनी मुलांसाठी असलेल्या शासकीय योजनांची माहिती चित्ररथाच्या माध्यमातून दिली होती. तर सुपने विभागातील शाळांनी "वारी आली शिक्षणाची' या अभंगाद्वारे महाराष्ट्राच्या वारकरी परंपरेचे दर्शन घडवले होते. चरेगाव विभागातील शाळांनी मुलगा आणि मुलगी यांच्यात केल्या जाणाऱ्या भेदभावाबाबत प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला. दुपारी बाराच्या सुमारास जुन्या कोयना पुलानजीक या चित्ररथांसह ग्रंथदिंडीची सांगता झाली.