होमपेज › Satara › पाटण तालुका शिक्षणाचा बिहार झालाय का?

पाटण तालुका शिक्षणाचा बिहार झालाय का?

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पाटण : गणेशचंद्र पिसाळ 

भावी पिढ्यांचा मूलभूत महत्त्वपूर्ण पाया भक्कम करण्याचे पवित्र काम ज्या प्राथमिक शिक्षकांच्या हाती आहे अशा शिक्षकांची मुजोरी दिवसेंदिवस वाढतच चालल्याने थेट पदाधिकारी व वरिष्ठ अधिकार्‍यांना धमक्या दिल्या जात आहेत. त्यामुळे पाटण तालुक्यात प्राथमिक शिक्षणाची दयनीय अवस्था होऊ लागली आहे. शालेय वेळेत हे शिक्षक गावागावांत कट्यांवर रोडरोमीओंप्रमाणे बसून पोषण आहारावरच डल्ला मारत शाळातच रंगीत संगीत पार्ट्या करून वरिष्ठांच्या कारवाईवर आत्महत्येची धमकी दिली जात असेल तर पाटणचा बिहार झालाय का ? अशी भिती पालक वर्गातून व्यक्त केली जात आहे. 

नुकत्याच झालेल्या पंचायत समितीच्या मासिक सभेत सत्ताधार्‍यांसह विरोधकांनीही या मुजोर शिक्षकांविषयी प्रचंड आरोप, तक्रारी केल्या. यावर आता शिक्षण विभाग व वरिष्ठ अधिकारी नक्की कोणती कारवाई करणार याकडेही सर्वांच्यांच नजरा लागल्या आहेत. तालुक्यात काही विभागात निश्‍चितच अनेक शिक्षकांचे काम कौतुकास्पद आहे. शाळा आय एस ओ करण्यासह डिजिटल करण्यावरही मान्यवर अधिकारी, शिक्षकांचा भर आहे. मात्र त्याचवेळी काही ठराविक विभागात राजकिय किंवा संघटनांच्या आश्रयाखाली दिवसेंदिवस ही मुजोरी वाढतच चालली आहे. हे राजाश्रय लाभलेले शिक्षक शाळेत कमी आणि पुढार्‍यांच्या मागे जास्त पहायला मिळतात. कोणत्याही निवडणुकातील हुकमी एक्का म्हणून ख्याती असणार्‍या या मंडळींनी याचाच गैरफायदा घेऊन ही मुजोरी वाढवली आहे. तर कित्येकदा यामुळे बाहेरून आलेल्या प्रामाणिक शिक्षकांचीही ही मंडळी गळचेपी करत असल्याच्या तक्रारी होतात 

मात्र राजकीय सोयरीक लक्षात घेता मग मान्यवर अधिकारीदेखील कारवाई धजत नसल्याने मग त्यांनाही उघड उघड आत्महत्येच्या धमक्या देण्याचे धाडस या शिक्षकांमध्ये आले आहे. वेळेतच जर या कारवाया झाल्या असत्या तर निश्‍चितच आज वरिष्ठांपुढे अशी हतबल होण्याची वेळ आली नसती याचाही विचार होणे क्रमप्राप्त आहे. शालेय वेळेत काही शिक्षक गावागावांत फिरताना दिसतात तर अनेकजन रोडरोमीओंप्रमाणे कट्यांवर किंवा दुचाकीवरून हिरोगीरी करतात. एवढं करूनही कारवाई करण्याचे धाडस वरिष्ठांनी दाखविले तर धमक्या दिल्या जातात. पदाधिकार्‍यांनाच जर याबाबत जाहीर आवाज उठवून न्याय मागावा लागत असेल आणि तरीही न्याय मिळत नसेल तर मग यापेक्षा शैक्षणिक शोकांतिका कोणती?  असा गंभीर प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

शिक्षण समिती सभापतींची भूमिका काय ?

पाटण तालुक्यातील राजेश पवार हे सध्या जिल्हा परिषद शिक्षण सभापती आहेत. मात्र त्यांच्याच तालुक्यात शैक्षणिक अवस्था बिहारप्रमाणे झाली असून याबाबत आता जिल्हा परिषद शिक्षण विभाग व सभापती याबाबत नक्की कोणती भूमिका घेणार ? याबाबतही सार्वत्रिक नजरा लागल्या आहेत.