Mon, Aug 19, 2019 04:55होमपेज › Satara › कर्मवीरांचा वारसा जपणारं कॉलेज (Video)

कर्मवीरांचा वारसा जपणारं कॉलेज (Video)

Published On: Feb 12 2018 11:25PM | Last Updated: Feb 12 2018 11:25PMसातारा : सुशांत पाटील 

सात दशकापूर्वी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सुरु केलेल्‍या कमवा आणि शिका योजनेच्या माध्यमातून दिलेलं ‘स्वावलंबी शिक्षणा’चं ब्रीद रयत शिक्षण संस्थेने आजही जपले आहे. अत्यंत बिकट परिस्थितीतून आलेले विद्यार्थी कमवा आणि शिका योजनेत प्रवेश घेऊन पडेल ते काम करत आपलं शिक्षण पूर्ण करत आहेत. अगदी कुटुंबात असणारं हसतं -खेळतं वातावरण या योजनेतील विद्यार्थ्यांमध्ये पहायला मिळत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या घामाला समाजात प्रतिष्ठा तर मिळत आहेच पण कुठल्याही क्लासमध्ये न मिळणारा स्वावलंबी जगण्याचा मार्ग विद्यार्थ्यांना या योजनेत मिळत असल्याचा आनंद त्यांच्या चेहर्‍यावर स्पष्टपणे जाणवत आहे, हेही तितकचं खरं।

कर्मवीर भाऊराव पाटील यांनी 1919 साली रयतची स्थापना केली. या संस्थेअंतर्गत असलेल्या छत्रपती शिवाजी महाविद्यालयात 1948 साली त्यांनी देशातील पहिला प्रयोग राबविला तो म्हणजे ‘कमवा आणि शिका’ ही योजना. गरिबीतून आलेल्या विद्यार्थ्यांना या योजनेमुळे शिक्षणाची योग्य दिशा दाखवली. 70 वर्षाच्या कालखंडात हजारो विद्यार्थ्यांनी कमवा आणि शिका योजनेतून आपले करिअर घडविले आहे.

वेगवेगळ्या जिल्ह्यातून आलेले गरीब घरातील विद्यार्थी कमवा आणि शिका योजनेत अगदी तळमळीने काम करतात. गुराढोरांच्या धारा काढणे, शेण काढणे, जनावरांना चारा देणे, या बरोबर शेतीतील सर्व कामे विद्यार्थी अगदी नित्यनियमाने करतात. 

कमवा आणि शिका योजनेच्या कामाची विभागणी करुन दिली आहे. सकाळी 6 वाजता या विद्यार्थ्यांचा दिनक्रम सुरु होतो. ज्यूनिअर आणि सिनीयर असे या विद्यार्थ्यांचे गट केले आहेत. ज्युनिअर महाविद्यालयातील विद्यार्थी दुपारी 2 ते 6 या वेळेत काम करतात. तर सिनीअर विद्यार्थी सकाळी आणि संध्याकाळी असे दोन तास काम करतात.
सध्या कमवा आणि शिका योजनेत 40 विद्यार्थी आणि 13 विद्यार्थिनी काम करत असून, रयतचे सचिव डॉ. भाऊसाहेब कराळे आणि कमवा आणि शिका योजनेचे प्रमुख डॉ. रामराजे मानेदेशमुख यांचे मार्गदर्शन या विद्यार्थ्यांना लाभत आहे.

विद्यार्थ्यांच्या घामातून लाखोंचे उत्पन्न
कमवा आणि शिका योजनेचे काम 13 एकरात चालते. यामधील गोडोली बागेत 1 एकर गहू, 4 एकर ऊस, ज्वारी, पालेभाज्या, मेथी, कोथिंबीर, कोबी यासारखी विविध पीके घेतली जातात. गेल्याच महिन्यात विद्यार्थ्यांच्या कष्टातून 6 गुंठ्यांच्या परिसरत गुर्‍हाळ केलं होतं. त्याचे 36 हजार इतके उपन्न विद्यार्थ्यांनी काढले. गतवर्षी तर, या योजनेच्या शेतीतून विद्यार्थ्यांनी शंभर टन ऊस, 35 पोते सोयाबीन, 12 पोते ज्वारी, आठ पोते भात यातून लाखों रुपयांचे उत्पन्न विद्यार्थ्यांनी काढले आहे. हे विशेष म्हणजे विद्यार्थ्यांच्या कष्टातील भाजीपाला,  दूध नागरिकांसह रयतचा संपूर्ण स्टाफ खरेदी करतात.

होय, अण्णांमुळे बनलोय स्वावलंबी!

‘‘अण्णांनी आपल्या आयुष्यात स्वत:साठी असं काहीच केलं नाही. मात्र, तळागाळातून आलेल्या गरिबांच्या पोरासाठी त्यांनी आपलं उभं आयुष्य घालवलं. त्यामुळेच गरिबीतून शिक्षणाची योग्य दिशा कमवा आणि शिका योजनेतून हजारो विद्यार्थ्यांना मिळत आहे.’’ या योजनचे विद्यार्थी अगदी अभिमानाने स्वावलंबी जगण्याचे गोडवे गात अण्णामुळेच आम्ही स्वावलंबी बनल्याचे अभिमानाने सांगतात.