Fri, Jun 05, 2020 13:02होमपेज › Satara › मलकापूरच्या मतदार यादीत बोगस नावे

मलकापूरच्या मतदार यादीत बोगस नावे

Published On: Sep 18 2019 1:44AM | Last Updated: Sep 17 2019 10:44PM
कराड : प्रतिनिधी

मतदार यादी पुनर्निरीक्षण कार्यक्रमादरम्यान कराड दक्षिण विधानसभा मतदार संघातील मलकापूर शहरात मतदार यादीमध्ये ऑनलाईन दाखल अर्जांची पडताळणी न करता बोगस नावांचा समावेश झाला आहे. बीएलओंकडून पडताळणी व प्रत्यक्ष कागदपत्रांची तपासणी न झालेली नावे मतदार यादीतून वगळण्यात यावीत, अशी मागणी करत कराड दक्षिण काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मनोहर शिंदे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी याबाबतचे निवेदन तहसिलदार अमरदीप वाकडे यांना दिले आहे. 

विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने विधानसभा मतदार यादी पुर्ननिरिक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. यासाठी दि.20,21,27 व 28 जुलै 2019 या तारखा निश्चित केल्या होत्या. दि. 1 जानेवारी 2019 या अर्हता दिनांकावर मतदार यादी विधानसभेसाठी गृहित धरणेत येणार होती.

परंतु, मलकापूर शहरातील पुरवणी यादीमध्ये नावे समावेश करताना नव्याने समावेश करण्यात आलेल्या मतदार यादीमध्ये  बीएलओ मार्फत मतदान नोंदणीसाठी आलेले अर्ज व प्रत्यक्ष मतदार यादीमध्ये आलेली नावे यामध्ये तफावत दिसून येत आहे. तसेच ऑनलाईन मतदान नाव नोंदणीसाठी आलेल्या अर्जांची पडताळणी बीएलओ मार्फत होणे गरजेचे आहे. एकुण बीएलओकडे आलेल्या अर्जांची नोटीस काढुन पडताळणी करण्यात आलेली आहे. परंतू, बीएलओचे व्यतिरिक्त जे थेट अर्ज सादर झाले त्याची पडताळणी बीएलओ मार्फत झालेली दिसुन येत नाही. यामध्ये बरीच नांवे नियमाप्रमाणे आवश्यक असणारी कागदपत्रे न जोडतासुध्दा यादीमध्ये समाविष्ट झालेली आहेत. 

त्याचबरोबर त्याची माहिती बीएलओ / बीएलए यांना न देता परस्पर निवडणूक शाखेमध्ये निर्णय घेऊन समाविष्ट करण्यात आलेचे प्रथमदर्शनी दिसुन येत आहे. तरी मलकापूर शहरातील नवीन पुरवणी मतदान यादीमध्ये बीएलओ मार्फत पडताळणी व प्रत्यक्ष कागदपत्रांची तपासणी न करता मतदार यादीमध्ये नाव नोंद झालेल्या मतदारांची नावे आपले स्तरावरुन चौकशी होऊन वगळण्यात यावीत. अशी मागणी करत काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांसह कार्यकर्त्यांनी तहसिलदारांना निवेदन दिले.  

निवेदनावर मनोहर शिंदे यांच्यासह नगराध्यक्षा सौ. निलम येडगे, बांधकाम सभापती राजेंद्र यादव, नानासो रैनाक, योगेश शिंदे, अभिजित शिंदे, अजय शिंगाडे यांच्या सह्या आहेत.