होमपेज › Satara › डुबलवाडीत वणव्यामुळे शेतकर्‍यांचे नुकसान

डुबलवाडीत वणव्यामुळे शेतकर्‍यांचे नुकसान

Published On: Apr 17 2018 1:51AM | Last Updated: Apr 16 2018 10:52PMतळमावले : वार्ताहर

पाटण तालुक्यातील डोंगरांना लागलेले वणवे थांबण्याचे नाव घेत नाहीत. खळे आणि शिद्रुकवाडीच्या हद्दीतील डोंगरांना लागलेल्या वणव्यामुळे वनसंपदेबरोबर डोंगरालगतच्या शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे वणवे विझवण्यासाठी कुणी वनरक्षक देता का असे म्हणण्याची वेळ शेतकर्‍यांवर आली आहे.

वणवे लावणार्‍यांवर कायदेशीर कारवाईची तरतूद असताना देखील ते मोकाट सुटले आहेत. ‘वणवे लावणारे जोमात आणि वनविभाग कोमात’ अशी अवस्था पाटण तालुक्यातील वनविभागाची झाली आहे.  गेले तीन दिवस खळे, शिद्रुकवाडी परिसरातील कार्बेट दरा, नकटीखडीचा दरा, लांबडा मोहोळ, या शिवारातील डोंगर वणव्यामुळे फुलतो आहे. हा वणवा असाच पूर्वेकडे बागलवाडी, तुपेवाडी हद्दीकडे जाणार आहे. आणि पश्‍चिमेकडे मान्याच्यावाडीकडे जाणार आहे. 

या वणव्याने डुबलवाडी, शिद्रुकवाडी, काजारवाडी,  हद्दीतील काही शेतकर्‍यांचे गवत आणि झाडे तसेच शेताला घातलेली कुपने जळून खाक झाली आहेत. त्या शेतकर्‍यांचे नशीब चांगले की शेतामध्ये पीके असताना वणवा लागला नाही. नाहीतर पीके देखील जळून खाक झाली असती. 

या वणव्यांमुळे सरपटणारे जीव, दुर्मिळ औषधी वनस्पती, मोठी मोठी झाडे जळून खाक होत आहेत. या वणव्यांना आटोक्यात आणण्यासाठी वनविभागाने जागृत अवस्थेत प्रयतक् करायला हवेत. तसेच जिल्ह्यातील वनविभागाच्या वरिष्ठांनी पाटण तालुक्यातील डोंगरांना लागलेल्या वणव्या संदर्भात कठोर पाऊले उचलणे आवश्यक आहे. नाहीतर झकास डोंगर भकास व्हायला वेळ लागणार नाही

Tags :  fire, loos, farmer,satara news