होमपेज › Satara › दिवशी घाटातील दरड कोसळली

दिवशी घाटातील दरड कोसळली

Published On: Jul 31 2018 1:36AM | Last Updated: Jul 30 2018 10:33PMढेबेवाडी :  प्रतिनिधी

ढेबेवाडी पाटण रस्त्यावरील दिवशी घाटातील धोकादायक दरड अखेर रस्त्यावरच कोसळली. याबाबत दै. ‘पुढारी’त दि.30 जुलै रोजी घाटात दरड कोसळण्याचा धोका, असे सचित्र वृत्त प्रसिद्ध झाले होते.

ढेबेवाडीतल्या जनतेला तालुक्याच्या ठिकाणी म्हणजे पाटणला ढेबेवाडी- कराड - ते पाटण असा 60/65कि.मी.चा फेरफटका मारून जावे लागत होते. ते अंतर कमी करण्यासाठी 1964/65 साली ढेबेवाडी ते दिवशी, मरळी मार्गे नवारस्ता ते पाटण असा 14/15 कि.मी.अंतराचा डोंगर फोडून  घाट रस्ता तयार करण्याचे काम लोकनेते स्व.बाळासाहेब देसाई यांच्या कार्यकाळात हाती घेतले. तो रस्ता पुर्ण झाल्यानंतर पाटणला जाण्याचे अंतर 25/30 कि.मी.नी कमी झाले. पण संरक्षक कठडे ढासळून नादुरूस्ती,  धोकादायक आणि अरूंद वळणे, कामाचा निकृष्ट दर्जा, अधिकार्‍यांचा बेजबाबदारपणा, दरडी वा दगडे ढासळणे, वाहतूक बंद पडणे, वाहन धारक व जनतेने दुरूस्तीची मागणी करणे,अशा कारणानी हा रस्ता गेली 50 वर्षे चर्चेत आहे.  

या घटा रस्त्यावर आतापर्यंत कोट्यावधी रूपये शासनाने खर्ची टाकले आहेत. पण तरीही हा रस्ता धोकामुक्त बनलाच नाही. दरवर्षी दरडी कोसळण्याचा प्रकार घडतो. त्यावर तात्पुरती मलमपट्टी केली जाते. पुन्हा पावसाळ्यात ये रे माझ्या मागल्या हे गेल्या तीस वर्षापासून सुरूचआहे. पण त्यावरुन कुणी बोध घेतल्याचे दिसले नाही. 

आता सुद्धा सात कोटी रूपये खर्चून या रस्त्याचे मजबुतीकरण, रूंदीकरण सी.डी.वर्क, डांबरीकरण अशी कामे गेल्या दोन वर्षापासून सुरू आहेत. पण ती दर्जाहीन असल्याच्या तक्रारी आणि आंदोलनाच्या इशार्‍याने गाजत आहेत. सध्या या रस्त्यावर दरड कोसळल्याने हा रस्ता वाहतूकीस धोकादायक बनला आहे.