Mon, Aug 19, 2019 17:43होमपेज › Satara › ‘नाईकबाच्या नावानं चांगभलं’चा गजर

‘नाईकबाच्या नावानं चांगभलं’चा गजर

Published On: Mar 23 2018 10:30PM | Last Updated: Mar 23 2018 10:12PMढेबेवाडी : प्रतिनिधी 

‘नाईकबाच्या नावांन चांगभल’च्या गजरात दोन लाखापेक्षा जास्त भाविकांच्या उपस्थितीत बनपुरीत(ता. पाटण) नाईकबा देवाची यात्रा मोठ्या उत्साहात झाली.चैत्र शुद्ध पंचमी व षष्टी हा नाईकबा देवाचा नैवद्याचा व पालखी सोहळा उत्साहात झाला. गुरूवारपासूनच डोंगरावर भाविकांनी हजेरी लावली होती. शुक्रवारी पहाटे पाचच्या सुमारास देवाच्या पालखीस सुरूवात झाली. ‘नाईकबाच्या नावानं चांगभल’च्या गजरात व गुलाल खोबर्‍याच्या उधळणीत आणि सासन काठ्या नाचवित सवाद्य मिरवणूक निघाली. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील कागल, कोल्हापूर, कराड, पाटण, इस्लामपूर, मिरज या आगारातून थेट देवालयापर्यंत भाविकांना आणण्याची सोय केली होती. याशिवाय खासगी वाहनांसह मोटारसायकलवरूनही मोठ्या संख्येने भाविक दाखल झालेले होते. एसटी महामंडळाने डोंगर पठारावरच एसटी पार्किंगची व बसेस सोडण्याची तर अन्य ठिकाणी पोलिसांनी खासगी वाहनतळ उभारून पार्किंगची सोय केली होती.

यात्रा बंदोबस्तासाठी मोठ्या संख्येने पोलिस यंत्रणा ठेवली होती. पाटणच्या उपविभागिय पोलिस अधिकारी निता पडवी, ढेबेवाडीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वप्निल लोखंडे यांच्यासह सहा सहायक पोलीस निरिक्षक, होमगार्ड आणि ग्रामपंचायतीसह देवस्थान ट्रस्टचे स्वयंसेवक असा मोठा फौजफाटा तैनात होता. देवस्थान ट्रस्टने सीसीटीव्ही कँमेरे लावल्याने त्याद्वारे यात्रेवर प्रशासन नजर ठेऊन होते. परिणामी कोणताही अनुचित प्रकार न घडता यात्रा सुरळीत पार पडली. यात्रेसाठी बनपुरी ग्रामपंचायतीने नळपाणीपुरवठा योजनेद्वारे, देवस्थान ट्रस्ट व पाटण पंचायत समिती, पाटण तालुका खरेदी विक्री संघामार्फत टँकरद्वारे पाण्याची सोय केली होती, यात्रा कालावधीत सळवे आणि सणबूर प्राथमिक आरोग्य केंद्र व ढेबेवाडी ग्रामीण रूग्णालय या यंत्रणेद्वारे आरोग्य सेवा चोख ठेवली होती. यात्रेपूर्वीच प्रशासनाने यात्रेचे सुरेख  नियोजन केले होते. पाटणचे प्रांताधिकारी श्रीरंग तांबे, तहसीलदार रामहरी भोसले, मंडलाधिकारी प्रविण शिंदे, ग्रामविकास अधिकारी राठोड यांच्यासह प्रशासकीय यंत्रणा यात्रा नियोजन सांभाळत होते.