Thu, Jul 18, 2019 00:46होमपेज › Satara › खंडाळ्यात आरक्षणासाठी धनगर समाजाचा एल्गार

खंडाळ्यात आरक्षणासाठी धनगर समाजाचा एल्गार

Published On: Aug 04 2018 1:37AM | Last Updated: Aug 03 2018 11:20PMलोणंद : प्रतिनिधी

धनगर समाजाला एस. टी चे आरक्षण मिळावे, या मागणीसाठी खंडाळा तालुक्यातील धनगर समाजाच्या वतीने  शुक्रवारी सकाळी लोणंद मध्ये भव्य मोर्चा काढून एल्गार पुकारला. मोर्चा काढल्यानंतर खंडाळा तहसिल कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात आले. 

यळकोट यळकोट जय मल्हारच्या घोषणांनी, भंडार्‍याची उधळण धनगर समाजाच्या भाविकांनी मेंढरांसोबत घेऊन हा भव्य मोर्चा काढला. त्यामुळे तालुक्यात मराठा समाजाच्या भगव्या वादळानंतर पिवळे वादळ अवतरले होते. खंडाळा तालुका धनगर आरक्षण कृती समितीच्यावतीने 3 ऑगस्टला धनगर समाज आंदोलन करणार असल्याची माहिती दिली होती. त्यानुसार आरक्षणासाठी शुक्रवारी सकाळी लोणंद येथील राजमाता अहिल्यादेवी स्मारक येथून आरक्षण मिळवण्यासाठी भव्य मोर्चास सुरूवात झाली.

राजमाता अहिल्यादेवी यांच्या स्मारक पुतळ्यास  पुष्पहार अर्पण करून हा मोर्चाला प्रारंभ झाला. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नितीन भरगुडे - पाटील, माजी समाज कल्याण सभापती आनंदराव शेळके पाटील, कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते अ‍ॅड. बाळासाहेब बागवान, उपसभापती वंदना धायगुडे - पाटील, माजी सभापती रमेश धायगुडे पाटील, नगराध्यक्षा स्नेहलता शेळके  पाटील, लता नरुटे, उपनगराध्यक्ष लक्ष्मणराव शेळके, नगरसेवक हणमंतराव शेळके, सचिन शेळके,  भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद क्षीरसागर, डॉ. नितीन सावंत, योगेश क्षीरसागर, रविंद्र क्षीरसागर, राजेंद्र डोईफोडे, बाळासाहेब शेळके, शिवाजीराव शेळके, मस्कु आण्णा शेळके, सर्व नगरसेवक व डॉक्टरांनी या मोर्चात सहभाग घेतला होता. 

धनगर समाजाच्या वतीने काढण्यात आलेल्या आरक्षण मोर्चा व ठिय्या आंदोलनात धनगर समाजाबरोबर मराठा, माळी याबरोबरच सर्व समाजातील तर राष्ट्रवादी, काँग्रेस, भाजपा, शिवसेना, रासप यांच्यासह सर्वच राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. धनगर समाजाच्या आरक्षणाच्या निमिताने संपूर्ण खंडाळा गाव व तहसिलदार कार्यालय परिसर पिवळ्या वादळाने व्यापून गेला होता.

लोणंद शहरातील मुख्य स्त्यावरून मोर्चा यळकोट यळकोट जय मल्हारचा गजर करत धनगड दाखवा नाहीतर श्राद्ध घाला या घोषणांनी लोणंदनगरी दणाणून सोडली. या मोर्चा मध्ये मोठया प्रमाणावर धनगर समाजातील युवक, नागरिक सहभागी झाले होते. आता नाही तर कधीच नाही यामुळे धनगर आरक्षणाच्या निमित्ताने लोणंदनगरीमध्ये पिवळे वादळ अवतरल्याचे चित्र निर्माण झाले होते. मोर्चा लोणंदच्या बाजारतळा पर्यंत आल्यानंतर सर्व धनगर समाज बांधव खंडाळा तहसीलदार कार्यालय समोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यासाठी रवाना झाले.

या नंतर हा मोर्चा खंडाळा तहसीलदार कार्यालयासमोर आला. यावेळी धनगर बांधवांनी विविध घोषणाबाज करत सरकारविरोधात आपला रोष व्यक्त केला. त्यामुळे परिसर दणाणून गेला होता. यावेळी मान्यवरांनी सरकारने आपली फसवणूक केली असून आरक्षण मिळाल्याशिवाय आंदोलन स्थगित करणार नसल्याची भूमिका घेतली.  

आजपर्यंत सत्ताधार्‍यांनी धनगर समाजाचा वापर करून घेतला. आता धनगर समाजाचा एस.टी प्रवर्गात समावेश होत नाही. तोपर्यंत धरणे आंदोलन चालूच ठेवणार असल्याचा निर्धार धनगर समाज बांधवांनी व्यक्त केला. खंडाळा तालुक्यातील धनगर समाज आरक्षण कृती समितीच्यावतीने लोणंद येथून काढण्यात आलेला मोर्चा खंडाळा गावातून   खंडाळा तहसिल कार्यालयावर पोहोचल्यानंतर ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले. 

यावेळी कृषी सभापती मनोज पवार, प्रा .एस .वाय . पवार , अजय भोसले , अ‍ॅड. सचिन धायगुडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.  महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी धनगर समाजाचा माणूस बसला तर धनगरांबरोबर मराठयांनाही आरक्षण मिळेल. महाराष्ट्रातील मागासलेल्या धनगर, मराठा व रामोशी समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, अशी आग्रही भूमिका पुरूषोत्तम जाधव यांनी मांडली. तर मराठा समाजातील प्रस्थापित सत्ताधार्‍यांनी आजपर्यंत मराठा समाजाला आरक्षण का दिले नाही? असा सवाल उपस्थित करत तरुणांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

खंडाळा येथील शिवाजी चौक, संभाजी चौक, बसस्थानक, मोती चौक, बाजारपेठ मार्ग ते तहसिल कार्यालयावर मोटारसायकल रॅली काढण्यात आली. यावेळी धनगर तरुण मोठया संख्येने उपस्थित होते.  महिलांच्या हस्ते मागण्यांचे निवेदन तहसिलदार विवेक जाधव यांना देण्यात आले. यावेळी सपोनि हणमंतराव गायकवाड यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. दरम्यान, खंडाळा तहसिलदार कार्यालयासमोर धनगर समाजाचे वतिने आरक्षण मिळत नाही तोपर्यत बेमुदत धरणे आंदोलन केले जाणार आहे. या ठिय्या , धरणे आंदोलनात गावागावातील धनगर समाजातील तरुण, नागरीक रात्रं -दिवस सहभागी होणार आहेत.